भाईंंदर : न्यायालयांचे आदेश व नंतर केंद्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या आदेशांचे काटेकोर पालन यंदाच्या गणेशोत्सवात व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच कार्यवाही सुरू केली आहे. पीओपीच्या बंदी असलेल्या मूर्ती बनवणे व विक्री करू नये, ४ फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असून नये, अशा मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा सुद्धा पालिकेने दिला आहे. मूर्तिकार व गणेशोत्सव मंडळांना सुद्धा बैठक घेऊन मार्गदर्शक तत्वांच्या प्रति देऊन अवगत करण्यात आले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व रासायनिक रंग हे पर्यावरण तसेच जलजीवसृष्टीला घातक असून त्याचे विपरीत परिणाम मानवी जीवनावर देखील होत असतात. त्यामुळे न्यायालयासह केंद्र शासनाने देखील त्याचे गांभीर्य ओळखून पीओपीच्या मूर्तीं ऐवजी पर्यावरणपूरक साहित्यापासून मूर्ती करा व अशाच मूर्तींचा वापर करा अशी भूमिका घेण्यात आली आहे.
पीओपीच्या मूर्तींना बंदी असून देखील मीरा-भाईंदर महापालिका अधिकारी हे जाणीवपूर्वक न्यायालय व शासन आदेशाचे उल्लंघन करत पीओपीच्या मूर्तींना मोकळीक देत आहे. शासन निर्देशांचे देखील पालन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले नाही. त्यामुळेच पीओपीच्या मूर्ती सर्रास बनवल्या गेल्या व त्याची विक्री आणि वापरसुद्धा उघडपणे होत आहे. त्यामुळे पालिकेकडूनच न्यायालय व केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत पर्यावरणाची अतोनात हानी केली जात असल्याची टीका होत आहे.
यंदा विद्यमान पालिका आयुक्त संजय काटकर यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच गणेशोत्सव येण्याच्या काही महिने आधीच महापालिकेने मार्गदर्शक तत्वे जरी केली आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२२ रोजी जारी केलेल्या मूर्ती विसर्जनाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आलेली आहेत. पीओपी, थर्माकोल वा पॉलिस्टीरिन पासूनची मूर्ती टाळून त्या जागी पारंपरिक शाडू माती, कागदी लगदा, नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगद्रव्यांचा वापर आदी पर्यावरणपूरक वस्तूपासून मूर्तीं तयार कराव्यात. त्याच मूर्ती विक्रीसाठी ठेवाव्यात असे पालिकेने स्पष्ट केले आहे. घरगुती व सार्वजनिक मूर्तीची उंची चार फुटापर्यंत ठेवणे, मूर्तिकारांनी शाडू माती किंवा पर्यावरणपूरक मूर्तीच्या उजव्या खांद्याच्या मागील बाजूस एक इंचाचे हिरवे वर्तुळ लावून चिन्हांकित करणे इत्यादी सूचना मूर्तिकारांना देण्यात आल्या आहेत.
पर्यावरणाच्या संरक्षणासोबतच शाश्वत पद्धतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आहे. नागरिक , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कल्याणकारी संघटना, मूर्तिकार आणि कुटुंबांनी उत्सवांपूर्वी, उत्सवादरम्यान व उत्सवानंतर पालिकेच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून उत्सवांचा पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होईल.
- संजय काटकर (आयुक्त , मीरा-भाईंदर महापालिका )
पर्यावरणाला बाधक अशा पीओपी मूर्तींऐवजी पर्यावरणपूरक मूर्ती बंधनकारक करण्याची मागणी आपण पालिकेकडे केली होती. आपण इको फ्रेंडली व पीओपी मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांचा मेळावा आयोजित करणार आहोत . त्यात पीओपीओ मूर्तिकारांना पर्यांवरण पूरक मूर्ती बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी सुद्धा पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा. येणाऱ्या गणेशोत्सवात आपण केवळ पर्यावरणपूरक मूर्ती असेल तेथेच दर्शनासाठी जाणार आहोत. वाढते जलप्रदूषण रोखणे ही काळाची व भविष्याची गरज आहे.
- हसमुख गेहलोत, ( माजी उपमहापौर)