दरवर्षी मुरबाडच्या पाणीपुरवठ्यासाठी कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय योजना लागू केल्या जातात मात्र मुरबाडववरील पाणीटंचाईचे शुक्लकाष्ठ काही संपता संपेना असेच चित्र दरवर्षी पहावयास मिळत आहे. मुरबाड तालुक्यातील १८ गाव, ३६ वाड्या आणि पाडे पाणीटंचाईच्या समस्यांना सोमोरे जात आहेत. जसजसा उन्हाचा पारा वाढत आहे तसेच पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होत असल्याची खंत मुरबाडकरांनी व्यक्त केली आहे.
यंदा उन्हाचा पारा मार्च महिन्यापासूनच तळपू लागल्याने त्याची झळ एप्रिल महिन्यात अधिक जाणवू लागली आहे. अशा स्थितीत पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात धरणे भरली तरी उन्हाळ्यात धरणांची पातळी ४० टक्क्यावर येत असल्यामुळे पावसाचे पाणी जाते कुठे? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. ग्रामीण भागातील पाण्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आदिवासी वाड्या-पाड्यात, गावागावात पाण्यासाठी महिलांना, मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ज्यांच्या जमिनी पाण्यासाठी दिल्या त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, अशी स्थिती ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भागात अधिक दिसत आहे.