मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्यात खड्ड्यांमुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडल्या आहेत. ५ जुलै रोजी भाईंदर येथील काजूपाडा येथे खड्यामुळे एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर भागात तालुक्यांमध्ये खड्ड्यात पडून वाहनाच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या असताना रविवारी (दि. २९ ऑगेस्ट) रोजी रात्रीच्या सुमारास दिवा-आगासन येथे गणेश विठ्ठल फले (२२) या तरुणाचा खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुचाकीस्वार खाली पडून ट्रकखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ठाण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे कोपरी ब्रिजवर एका तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून ठामपा प्रशासनाचे पितळ उघडे पडल्यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर दिव्यात तरुणांला पुन्हा जीव गमवावा लागला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.
दिव्यात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्ते प्रवृत्तीने मूलभूत सुविधांपासून दिवावासी हा वंचित आहे. त्यातच रस्त्याची तर चाळण झाल्याची परिस्थिती सद्या दिसून येत असून याच रस्त्याच्या खड्ड्यात दुचाकी अडकून झालेल्या अपघातात पाले या तरुणांचा मृत्यू झाल्याने दिव्यातील रस्त्यांवरील खड्ड्याचे पितळ आता उघडे पडले आहे.