ठाणे

अखेर आंदोलकांना वनहक्क मिळेल; प्रशासनाचा असंवेदनशीलपणा आला चव्हाट्यावर

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापने अगोदरपासून या परिसरातल्या आदिवासी बांधवांनी वनहक्क दावे दाखल केले होते.

Swapnil S

वसई : वसई तालुक्यातील २००९ साल अगोदरपासून प्रलंबित असणारे वनहक्क दावे तात्काळ निकाली काढावेत, या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून वसई प्रांत कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेले श्रमजीवी संघटनेचे आंदोलन वनहक्क घेऊनच थांबले.

आंदोलकांनी आपला बिस्तारबोजा घेऊन प्रांत कार्यालयासमोर चुली पेटवत अनोखे धरणे आंदोलन सुरू केले होते. याचदरम्यान गुरुवारी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वनहक्क दाव्यांबाबत प्रशासनाचा असंवेदनशीलपणा आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे विवेक पंडित आणि आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी रात्री उशिरा वसई प्रांत कार्यालयात धाव घेत आंदोलकांना वनपट्ट्यांचे वाटप केले. यावेळी मागण्या मान्य झाल्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, वसईचे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपायुक्त आणि तहसीलदार यांचे शाल देऊन सन्मान केला आणि नाचत-गात आनंदोत्सव देखील साजरा केला.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापने अगोदरपासून या परिसरातल्या आदिवासी बांधवांनी वनहक्क दावे दाखल केले होते. परंतु प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि निष्काळजीपणामुळे वर्षानुवर्षे हे वनहक्क दावे प्रलंबित होते.

त्यामुळे वनपट्टे मिळावेत या मागणीसाठी सोमवारपासूनच श्रमजीवी संघटनेच्या वतीने वसई प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यासाठी अंथरूण-पांघरूण आणि जेवणाची साहित्य घेऊनच आंदोलक प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात घोषणाबाजी करत, तर कधी नाच गाणे करत प्रशासनाच्या नावाने बोंबा ठोकत बसले होते.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी प्रांत अधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या आढावा बैठकीत श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे तसेच, आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून कोणतंच ठोस आणि समर्पक उत्तर न मिळत असल्यामुळे विवेक पंडित यांनी देखील सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युलता पंडित, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित, उपाध्यक्ष दत्तू भाऊ कोळेकर, सरचिटणीस विजय जाधव आणि बाळाराम भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांचा नाचत-गात आनंदोत्सव

सरकारने वेळोवेळी अध्यादेश काढून वनहक्क दाव्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली असताना देखील प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत पंडित यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. अखेर, विवेक पंडित आणि आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी वसई प्रांत कार्यालयात धाव घेत आंदोलकांना वनपट्ट्यांचे वाटप केले. यावेळी मागण्या मान्य झाल्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचा सन्मान केला. तसेच आंदोलकांनी नाचत-गात आनंदोत्सव देखील साजरा केला.

मी जरी सरकारचा प्रतिनिधी असलो तरी देखील आंदोलकांमध्ये सहभागी होऊ शकतो, याचे भान ठेवा असा गर्भित इशारा दिल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. तसेच जे वनहक्क दावेदार आहेत त्यांनी सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली तर सरकारची नाचक्की होईल.

- विवेक पंडित, श्रमजीवी संघटना संस्थापक

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

श्रीमंत ऋषभ पंत! सर्वाधिक २७ कोटींची बोली, अय्यर दुकलीसाठीही संघमालकांनी मोजले कोटी रुपये