ठाणे

रोजा इफ्तारीसाठी कळवा, मुंब्रा-भिवंडी सज्ज; विविध खाद्यपदार्थ, सुकामेवा खरेदीसाठी बाजारात गर्दी

रमजान महिना ही मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असून या काळात महिनाभर मुस्लीम बांधव दिवसभर रोजा पाळून सायंकाळी एकत्र फलाहार करून उपवास सोडतात. ठाण्यातील हाजुरी, कळवा, मुंब्रा-कौसा परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव स्थायिक असून रमजान महिना आता अखेरच्या टप्प्यात असून सर्वत्र रोजा इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

Swapnil S

ठाणे : मार्च महिन्यापासून मुस्लीम बांधवांचा रमजान रोजा सुरू झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसांवर म्हणजेच ११ एप्रिल रोजी रमजान ईद आली असल्याने ठाण्यातील राबोडी, हाजुरी, मुंब्रा-कौसा आणि भिवंडी परिसरातील मुस्लीम बांधवांची रोजा इफ्तारी पार्टी सुरू आहे तसेच मुस्लीम बांधव रमजान ईद उत्साहात साजरी करण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यासाठी राबोडी, मुंब्रा मार्केट, स्टेशन रोड, भिवंडीतील गैबी नगर, तीनबत्ती रोड, नारपोली, भाईंदरातील नया नगर, कळव्यातील मशीद, टाकोली मोहल्ला आदी भागात मुस्लीम बांधवांची एकच लगबग सुरू झालेली दिसत आहेत.

रमजान महिना ही मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असून या काळात महिनाभर मुस्लीम बांधव दिवसभर रोजा पाळून सायंकाळी एकत्र फलाहार करून उपवास सोडतात. ठाण्यातील हाजुरी, कळवा, मुंब्रा-कौसा परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव स्थायिक असून रमजान महिना आता अखेरच्या टप्प्यात असून सर्वत्र रोजा इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मुस्लीम बांधवांकडून दावतचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मुस्लीम मोहल्ला कमिटीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने हिंदू-मुस्लीम सलोखाही पहायला मिळत आहे.

या इफ्तार पार्टीमध्ये हिंदू बांधवही सहभागी होत मुस्लिमांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. जसजसा रमजानचा सण जवळ येत जातो तसतसे भिवंडीतील गैबी नगर, समद नगर, सुभाष नगर, अंसर नगर आणि मुंब्रा मार्केट, स्टेशन रोड, अमृत नगर, अलमास कॉलनी, कौसा, शिळ आदी परिसरात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, मुले, महिला, पुरुषांच्या कपड्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची रेलचेल सुरू झालेली दिसत आहे. बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. या महिन्यामध्ये रोजे असल्याने सुकामेवा, मिठाई, फळे, खजूर, यांची मागणी वाढली आहे. यात सौदी अरेबिया, रसगुल्ला खजूर, केमिया, कॅडबरी, टोनिसिया, मेवावाला, ट्रे खजूर, डाली खजूर, अंगुरी, इराणी, बदाम, रोतब, खनिजी, इराकी खजुरांचा समावेश आहे.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. शिरखुर्मा गोड पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो. त्यानिमित्ताने मुस्लीम बांधवांकडून नवीन कपडे, शिरखुर्मासाठी लागणारे पदार्थ तसेच अन्य साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

रमजान ईद ११ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे आणखी ६ दिवस आहेत. ईद जवळ येताच बाजारातील गर्दी आणि उलाढाल यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पुढील आठवड्यातील शनिवार-रविवारी कापड खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतील. सध्या सर्वत्र महागाई आहे. मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरांत आम्ही सुविधा पुरवतो. रमजान काळात ग्राहकांनी पदार्थांची चव घेऊनच खरेदी करावी. इफ्तार पार्टी आयोजित असलेल्या ठिकाणी ताटातील सर्व पदार्थ संपले पाहिजेत. अन्न वाया जाऊ देऊ नये, असे आम्ही सर्वांना आवाहन करतो.

- यासर बगदादी, मुंब्रा

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश