ठाणे

ठाण्यातील ऐतिहासिक जोगिला तलावाला नवसंजीवनी; तलावाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू

उथळसर प्रभाग समितीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या मागे प्राचीन असा जोगिला तलाव ठाण्यातील प्रमुख तलावापैकी एक तलाव आहे.

Swapnil S

एकेकाळी झोपडपट्ट्यांनी व्यापलेला उथळसर रोडवरील जोगीला प्रभाग समितीच्या शेजारी असलेला जोगीला तलाव आता झोपडपट्टीमुक्त होऊन हळुहळू कासवगतीने आकार घेऊ लागला आहे. या तलावाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. तलावातील माती उपसून त्याचा गोल घेर तयार करण्याचे काम सुरू आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये तत्कालीन ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जोगीला तलावाजवळील झोपडपट्ट्या हटवून येथील रहिवाशांचे पुनवर्सन करण्यात आले. त्यानंतर या ऐतिहासिक जोगीला तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. तलावाच्या गॅबियन भिंतीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून तलावात पावसाळ्यात पाणी साठवले जाईल, असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जोगीला तलावाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त व्यक्त केला होता. दरम्यान, तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील व तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रिक सर्व्हे करून त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल, याबाबत नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते; मात्र अजूनही या तलावाच्या आसपास झोपडपट्ट्यांचा वेटोळा दिसून येत आहे, तर डीपी रस्त्याबाबतही अजूनही ठामपाकडून कोणतेच काम सुरू झालेले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२४ या चार वर्षात संथगतीने का होईना तलावाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील जवळपास ३५० कुटुंबांचे पुनर्वसन करून बीएसयूपी योजनेंतर्गत त्यांना घरे देण्यात आली आहेत. यासोबतच तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील व तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रिक सर्वे करून त्यांचे पुनर्वसन त्याच जागी कसे करता येईल, याबाबत नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्‍यांना दिले होते. तलावाच्या बाजूला असणारी मूळ तलावाची जास्तीत जास्त जागा यामध्ये कशी सामावून घेता येईल, याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देशही तत्कालीन आयुक्त जयस्वाल यांनी दिले होते. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी या तलावाच्या गॅबियन भिंतीचे बांधकामाचे काम पूर्ण करून पावसाळ्यानंतर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाणार होते; मात्र अजूनही तलावाचे ७० टक्के काम पूर्ण झालेले नाही.

जोगिला मार्केट येथील सिमेंट काँक्रीटमध्ये निद्रिस्त झालेल्या जोगिला तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम कासवगतीने सुरू आहे. तलावात अस्तित्वात असलेले सर्व नैसर्गिक स्रोत पुनर्जीवित झाले असून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरू होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र अजूनही तलावातील माती उपसण्याचे काम शिल्लक आहे त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत पुनर्जीवित होणे सोडाच पावसाचे पाणीदेखील तलावात शिल्लक राहताना दिसत नाही. नैसर्गिक तलाव संरक्षित करून अशा पद्धतीने पुनरुज्जीवित करण्यात येणारे हे देशातील पहिले उदाहरण ठरणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता; मात्र कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे हा तलाव पुनर्जीवित होऊन काही वर्षांत ठाणेकरांच्या सेवेत उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आहे.

उथळसर प्रभाग समितीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या मागे प्राचीन असा जोगिला तलाव ठाण्यातील प्रमुख तलावापैकी एक तलाव आहे. मागिल काही वर्षांत त्या तलावावर झोपडपट्टीमाफियांची वक्रदृष्टी पडल्यानंतर या ठिकाणी बुजवून मोठ्या प्रमाणावर बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. एकेकाळी या परिसरात ठाणेकर सकाळ-सायंकाळ पाय मोकळे करण्यास येत असत; मात्र तलावाचे अस्तित्वतच धोक्यात आले होते. हा तलाव मातीचा भराव टाकून पद्धतशीरपणे बुजविला जात असताना पालिका प्रशासनाचे त्याकडे सोईस्कर होते.

गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पालिकेचा पुढाकार

महापालिका प्रभाग समितीलगत असलेला हा तलाव बुजवला जातो आणि पालिकेला याचा गंध ही नव्हता. तलाव वचावण्यसाठी अनेक नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केले होते. काही जागरूक ठाणेकरांनी तलावाच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्नही असफल ठरले. तलाव नामशेष झाल्यानंतर पालिकेने आता त्याचा पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराला जोगीला तलावाच्या पुनर्बांधणीमुळे पुन्हा एकदा जुनी ओळख प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे शहरावर बारकाईने नजर असून, ठाण्यातील तलावांची दुर्दशा थांबवण्यासाठी आणि त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी नगरविकास विभाग आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी