ठाणे: आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना ठाण्यातील पत्रकार परिषदेत या प्रकरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ठोस उत्तर देता आले नाही. 'मला याबद्दल माहिती नाही', 'कदाचित पेपरफुटी प्रकरण आहे वाटतं', 'त्या विषयासंदर्भात व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे', अशी उत्तरे देत त्यांनी या प्रश्नावर संभ्रम व्यक्त केला.
साहिल वाकोडे हे आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी होते. १८ सप्टेंबर रोजी हॉस्टेलमधील खोलीत त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. साहिल यांच्या कुटुंबीयांनी एका प्राध्यापकाकडून जातीय भेदभाव आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत 'मला याबद्दल माहिती नाही', असे त्यांनी सांगितले. त्यानंतर 'कदाचित पेपरफुटी प्रकरण आहे वाटतं', असे म्हणत त्यांनी या प्रकरणाबाबत संभ्रम व्यक्त केला.
प्रश्न पुन्हा स्पष्ट करण्यात आल्यानंतर 'त्या विषयासंदर्भात व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे', असे खडसे यांनी सांगितले. त्यानंतर 'मला वाटतं परीक्षा फुटीबद्दल आहे ते', असेही त्यांनी म्हटले. अशा संवेदनशील प्रकरणावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने पत्रकार परिषदेत काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
साहिल प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले
आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणावरून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. साहिल यांच्या कुटुंबीयांनी जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप केले असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात एका प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याचेही वृत्त आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दौऱ्यावरही टीका
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या शेतकरी दौऱ्यावरही रोहिणी खडसे यांनी टीका केली. 'पहिले रोहित पवार बांधावर गेले, त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री बांधावर गेले,' असा संदर्भ देत त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ दिली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी, 'शेतकरी काही आतंकवादी आहेत का? जाताना काय ते बॉम्ब घेऊन जाणार का?', असा सवाल केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने त्यांच्याशी थेट संवाद साधावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. त्यामुळे एका बाजूला साहिल वाकोडे प्रकरणावरील प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून चर्चा रंगली, तर दुसरीकडे शेतकरी प्रश्नावर सरकारला लक्ष्य करताना रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली.