ठाणे

अपूर्ण बदलापूर स्थानकाच्या उद्घाटनाला विरोध

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या उद्देशाने कामांचे श्रेय घेण्यासाठी सरकारकडून अपूर्ण कामांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप

Swapnil S

बदलापूर: लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या उद्देशाने कामांचे श्रेय घेण्यासाठी सरकारकडून अपूर्ण कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. बदलापूर स्थानकाचे काम अर्धवट असताना देखील उद्घाटनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. काम अर्धवट असताना उद्घाटनाचा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही महाविकास आघाडीने दिला आहे.

बदलापूर रेल्वे होम स्थानकाचे येत्या २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख किशोर पाटील व राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी रेल्वे होम स्थानकाचे काम अपूर्ण असताना त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न झाल्यास महाविकास आघाडी त्याला विरोध करणार असल्याची भूमिका मांडली. अपूर्ण अवस्थेतील होम स्थानकामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगून अर्धवट अवस्थेत काम असताना उद्घाटन करण्याचा प्रयत्न झाल्यास माहविकास आघाडी त्याला विरोध दर्शवेल असा इशारा शैलेश वडंनेरे यांनी दिला.

किशोर पाटील यांनीही हाच धागा पकडून श्रेय जरूर घ्यावे, पण आधी काम पूर्ण करावे, अशी टीका केली. अर्धवट अवस्थेतील होम स्थानकामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन पाहणी केली. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच होम स्थानकाचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे महविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रसंगी अविनाश देशमुख, हरिश्चंद्र थोरात, दादासाहेब पाटील, अकबर खान, गिरीश राणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनाची घाई कशाला?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत होम स्थानकाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे, त्यामुळे श्रेय मिळवण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी अपूर्ण अवस्थेत असलेल्या बदलापूरच्या रेल्वे होम स्थानकाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केला. होम स्थानकावर शेड अर्धवट असल्याने प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पंखे अशा आवश्यक असलेल्या सोयीसुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. सरकते जिने, लिफ्टची कामे झालेली नाहीत, असे असताना उद्घाटनाची घाई कशाला? असा सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी