ठाणे

Thane : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा; साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला

मुंबई-नाशिक महामार्गवरील साकेत उड्डाणपूल अखेर मंगळवारपासून वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे.

Swapnil S

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गवरील साकेत उड्डाणपूल अखेर मंगळवारपासून वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुलाची वजन चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनचालकांना दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या वाहतूककोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ठाणे शहरातून जाणाऱ्या या महामार्गावरील जुना साकेत उड्डाणपूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने अवजड तसेच हलक्या वाहनांचा वेग मंदावत होता. परिणामी अवघ्या १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा तासभर कोंडीत अडकून राहावे लागत होते. या समस्येबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या अधिकाऱ्यांनी खारेगाव येथील नवीन साकेत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून केवळ वजन तपासणी शिल्लक असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून ३१ डंपरच्या सहाय्याने वजन चाचणी प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येक डंपर सुमारे ३५ टन वजनाचा असून २४ तास पुलावरून वाहतूक करून सर्व तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यात आली.

नवीन उड्डाणपूल सुरू झाल्याने ठाण्याहून नाशिककडे जाणारी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याचे चित्र आहे. मात्र, पूल ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने चार लेनची वाहतूक दोन लेनमध्ये येते आणि तेथे पुन्हा काही प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

जुन्या साकेत उड्डाणपुलाची दुरुस्ती लवकरच

नवीन साकेत उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे सुमारे ४५ वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्याहून नाशिककडे जाणारी जुनी मार्गिका बंद करण्यात आली असून त्या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हीच मार्गिका नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांनी दिली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग