ठाणे : गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे लागलेली आग ही प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या सहाय्यक आयुक्तांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
आगीची घटना कळल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी धाव घेत गावदेवी मार्केटमधील आपदग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी येथील एका तरुण व्यापाऱ्याने अनुभव कथन करत प्रशासनाचा बेजबाबदारपणा निदर्शनास आणून दिला. आग लागताच या व्यापाऱ्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे धाव घेत उपस्थित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली. मात्र त्याने कोणतीही हालचाल केली नाही. येथील अग्निशमन दल हलविण्यात आल्याने अखेर बाळकुम येथून मदत पोहोचायला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला, अशी माहिती या व्यापाऱ्याने केळकर यांना दिली. यावेळी आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाबाबत संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, पुनर्विकासाच्या कामामुळे जवाहरबाग येथील अग्निशमन दल हलविण्यात आले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळ दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात असाव्यात, अशी मागणी आम्ही केली होती. तसेच ही मंडई फळभाजी मार्केट असताना येथे कपडे आणि इतर साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती.
ही अतिक्रमणे दूर करावीत अशा सूचनाही प्रशासनाला केल्या होत्या, शिवाय मागणी करूनही या इमारतीचे फायर ऑडिटही केले नाही. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे अधिकाऱ्यांचे बळी गेले, असा आरोप केळकर यांनी केला.
‘त्या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास ठामपा सेवेत घ्या!
आग विझविताना स्थानक अधिकारी आणि आरक्षकाचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांना योग्य आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्यास महापालिकेच्या सेवेत घ्यावे. तसेच जखमी अधिकारी-कर्मचाऱ्यांना देखील तत्काळ वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार केळकर यांनी केली आहे.
आपदग्रस्तांना नुकसानभरपाई द्या!
या आगीत १५०हून अधिक दुकाने जळून खाक झाली. या फळभाजी विक्रेत्यांचे जवळील गावदेवी मैदानात तात्पुरते पुनर्वसन करावे, त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच नंतर त्यांचे कायस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करावी, असे केळकर म्हणाले.