ठाणे

Thane : स्वतंत्र लढलो असतो तर अधिक मते मिळाली असती; आमदार संजय केळकर यांचे मत

ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपची वाढली जबाबदारी अधिक असल्याचे मत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपची वाढली जबाबदारी अधिक असल्याचे मत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार भाजपने जर ठाण्यात सर्व १२५ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर राज्यात जे ठिकठिकाणी चित्र दिसले, तेच चित्र ठाण्यातही दिसले असते. मात्र, आता 'जर-तर'चा विचार करण्यात अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी ठाण्यात भाजपच्या विजयी उमेदवारांसह आयोजित पत्रकार परिषदेत केळकर बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले आदी उपस्थित होते.

आमदार केळकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळाले असून हे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचे फलित आहे. ठाणे तसेच संपूर्ण एमएमआर परिसरात भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. मात्र, या विजयाचा पक्ष कुठेही गर्व करणार नाही. उलट ही जबाबदारी अधिक गंभीरपणे पार पाडली जाईल, असे त्यांनी सांगितले.

ठाण्यात अनेक ठिकाणी बंडखोर व अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तरीही मतदारांनी सुज्ञपणाची भूमिका घेत महायुतीवर विश्वास दाखवला, असे केळकर म्हणाले. स्वतंत्रपणे लढलो असतो तर भाजपचा मतांचा टक्का अधिक वाढला असता, असे संकेत देत त्यांनी पुढील काळात भाजप अधिक ताकदीने उभा राहील, असेही स्पष्ट केले.

महापालिकेतील कारभारावर लक्ष ठेवण्याबाबत बोलताना केळकर म्हणाले की, नागरिकांना दिलेल्या निर्धारनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वेळ पडल्यास भाजप स्वतंत्र भूमिका घेऊन कारभारावर अंकुश ठेवेल. सत्तेच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी एक सक्षम शक्ती असणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ठाण्यात भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर अधिक जागा जिंकता आल्या असत्या का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता केळकर म्हणाले की, कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती. मात्र, निवडणूक आता पार पडली असून त्यामुळे 'जर-तर'ला काही अर्थ उरलेला नाही.

मुंबईप्रमाणे ठाण्यातही भाजप महापौरपदाची मागणी करणार का, या प्रश्नावर केळकर म्हणाले की, शिवसेनेकडून तसा प्रस्ताव आल्यास चर्चा केली जाईल. मात्र, महापौरपदासाठी भाजप कोणाच्या मागे धावणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष वेळप्रसंगी वेगळी भूमिका घेऊ शकतो - डावखरे

पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, भाजपने निर्धारनाम्यात ठाणेकर नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पक्ष वेळप्रसंगी वेगळी भूमिका घेऊ शकतो. मात्र, यासंदर्भात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यानुसारच पुढील भूमिका ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

घरगुती गॅस पुरवठ्यावर सरकारची नजर; जिल्हास्तरीय समित्या स्थापन, अफवांवर कारवाईचा इशारा

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल

'गॅस अपडेट'च्या नावाने ऑनलाइन फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा