उल्हासनगर : कल्याण - नगर महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाची अवस्था आता ‘महामार्ग’ नव्हे तर ‘खड्डामार्ग’ म्हणून होऊ लागली आहे. पंधरा दिवस वाहतूक बंद ठेवून राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र पुलावर डांबर नाही, खड्ड्यांचे साम्राज्य अशी अवस्था सध्या आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक, प्रवासी आणि वाहतूकदार वर्ग संतप्त झाला आहे.
अनेक वर्षांपासून शहाडचा उड्डाणपूल प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरला आहे. दर काही महिन्यांनी या मार्गावरील डांबर उखडते, खड्डे वाढतात. शहरातील विविध राजकीय पक्ष, स्थानिक नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करून लक्ष वेधले.
अखेर सप्टेंबरच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग विभागाने २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला आणि दुरुस्तीचे काम सुरू केले. पण २६ ऑक्टोबरपर्यंतही रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली तसाच ‘अर्धवट आणि असुरक्षित’ अवस्थेत दिसत आहे.
पुलावरील रस्त्याचे पृष्ठभाग एवढे उखडले आहेत की वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी उंच-सखल खाचखळगे पडल्याने अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
कल्याण-मुरबाड मार्गाची स्थिती अत्यंत वाईट
कल्याण-मुरबाड मार्गाची स्थिती शहाड उड्डाणपुलापेक्षा वाईट आहे. म्हारळपासून मुरबाडपर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्षे कामाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.