ठाणे

वीज नसलेल्या शाळेत ‘डिजिटल शिक्षणा’चा गाजावाजा; शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा येथील झेडपी शाळेची वर्षभर उपेक्षा

‘डिजिटल शिक्षण’ आणि ‘स्मार्ट शाळा’च्या घोषणा जोरात सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील वास्तव प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक चित्र समोर आले आहे.

Swapnil S

ठाणे : ‘डिजिटल शिक्षण’ आणि ‘स्मार्ट शाळा’च्या घोषणा जोरात सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील वास्तव प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक चित्र समोर आले आहे. केवळ १,५०० रुपयांचे वीजबिल थकले असल्यामुळे या शाळेचा वीजपुरवठा मागील तब्बल एक वर्षापासून खंडित असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः अंधारात सुरू आहे. या प्रकारावर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शाळेच्या दयनीय अवस्थेबाबत तक्रारी मिळाल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत शाळेतील मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव उघडकीस आला. शाळेत सध्या ३९ विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ दोन वर्गखोल्यांमध्ये सर्व इयत्तांचे अध्यापन केले जात आहे. एका वर्गात तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी एकत्र बसतात, तर दुसऱ्या वर्गात इतर इयत्तांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

वीजपुरवठा नसल्यामुळे शाळेत उपलब्ध असलेले स्मार्ट टीव्ही व डिजिटल शिक्षण साहित्य पूर्णपणे निष्क्रिय झाले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशा बाकांची कमतरता, अनेक विद्यार्थ्यांकडे गणवेश व दप्तरांचा अभाव, तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधांचा तुटवडा असल्याचे चित्र पाहणीत दिसून आले. या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण पाहणीचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मनसेचा थेट सवाल

ठाण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात जर जिल्हा परिषद शाळांची ही अवस्था असेल, तर राज्यातील दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती काय असेल? मूलभूत सुविधांशिवाय शिक्षण दिले जात असेल, तर विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच राहतात, असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शाळेला वीजपुरवठा सुरू करणे व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती