Thane : गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणात १५ कोटींची वाढ; महापालिकेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

Thane : गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणात १५ कोटींची वाढ; महापालिकेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणेकरांची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नूतनीकरणाच्या कामात तब्बल १५ कोटी रुपयांची खर्चवाढ झाल्याने ठाणे महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणेकरांची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नूतनीकरणाच्या कामात तब्बल १५ कोटी रुपयांची खर्चवाढ झाल्याने ठाणे महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरुवातीला २३ कोटी रुपयांत पूर्ण होणारा प्रकल्प अखेर ३८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला असून, या वाढीव खर्चासाठी जबाबदार कोण, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही.

राज्य शासनाने गडकरी रंगायतनाच्या नूतनीकरणासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र काम पूर्ण होईपर्यंत खर्चात तब्बल १५ कोटी रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे, या वाढीव खर्चासाठी राज्य शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याऐवजी हा आर्थिक भार महापालिकेवर टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच विविध प्रकल्प, ठेकेदारांची देणी आणि वाढत्या आर्थिक दायित्वांमुळे तणावपूर्ण आहे. अशा परिस्थितीत आणखी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मागील काही महासभांमध्येही कलम ७२ (ब) अंतर्गत वाढीव खर्चाचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे "आधी काम करा आणि नंतर खर्च मंजूर करून घ्या" ही पद्धत महापालिकेत रूढ होत असल्याची टीका होत आहे.

गडकरी रंगायतनाचे नूतनीकरण पूर्ण होऊन ऑगस्ट २०२५ पासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी वाढीव खर्चाची रक्कम अद्याप अदा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठेकेदारांची देयके, निधीची उपलब्धता आणि आर्थिक शिस्त याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नियोजनाचा अभाव की आर्थिक अनागोंदी?

नूतनीकरणाचा आराखडा तयार करताना खर्चाचा अंदाज चुकीचा ठरला का, अथवा कामादरम्यान अतिरिक्त कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची वाढ करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढीव खर्चासाठी शासनाकडे निधी मागण्याबाबत चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात प्रभावी पाठपुरावा करण्यात आला नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अटींनुसार मंजूर निधीपेक्षा अधिक झालेला खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेलाच करावा लागणार असल्याने आता ही अतिरिक्त रक्कम महापालिकेलाच उचलावी लागणार आहे.

६५ टक्क्यांनी वाढला खर्च

नूतनीकरणाच्या कामात नवीन आसनव्यवस्था, रंगमंचाचे आधुनिकीकरण, अग्निसुरक्षा यंत्रणा, फॉल सिलिंग, तालीम हॉल, पार्किंग व्यवस्था तसेच शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र या सर्व कामांचा खर्च मूळ अंदाजापेक्षा सुमारे ६५ टक्क्यांनी कसा वाढला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. गडकरी रंगायतनाचा प्रश्न हा केवळ एका सांस्कृतिक प्रकल्पापुरता मर्यादित नसून महापालिकेच्या आर्थिक शिस्तीशी संबंधित आहे. २३ कोटी रुपयांचा प्रकल्प ३८ कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला, वाढीव खर्चासाठी जबाबदार कोण आणि ठाणेकरांच्या कराच्या पैशांवर हा अतिरिक्त बोजा किती काळ राहणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी होत आहे.

सौर कृषिपंपांमध्ये राज्याचा विक्रम; देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ६४ टक्के

खाद्यतेलाच्या पॅकिंग आकाराचे मानांकन होणार; पारदर्शकता वाढण्याचा उद्योग क्षेत्राचा अंदाज

Mumbai : अंधेरी सबवे तुंबल्याने नालेसफाईची पोलखोल; विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक; तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई

कोकण रेल्वेची जुलैपासून रत्नागिरी ते जेएनपीटी थेट कंटेनर रेल्वे सेवा