ठाणे : इलेक्ट्रिक वाहने घेऊ इच्छिणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील काही महिन्यांत ठाणे शहरात १९ सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती मिळणार आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये ई-व्हेईकल चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार असून, चार्जिंग स्टेशन्सची उभारणी खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या नफ्यातील १० टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार आहे. महापालिकेने यासाठी सल्लागार म्हणून खासगी संस्थेची नियुक्ती केली होती. संबंधित संस्थेसोबत ६ मे २०२५ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. २०२२ मधील महासभेच्या ठरावानुसार निश्चित करण्यात आलेल्या ३० जागांची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार १९ ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे शक्य असल्याचे नमूद करण्यात आले.
१० वर्षांच्या कालावधीसाठी निविदा
या प्रकल्पांतर्गत सुमारे १० कोटी ५० लाख रुपये खर्चून १९ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. हा संपूर्ण खर्च संबंधित निविदाकाराकडून केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची निवड करण्यात येईल. महापालिकेला किमान १ रुपया प्रति युनिट या दराने जास्तीत जास्त महसूल देणारी निविदा स्वीकारली जाणार आहे. निविदाकारास महापालिकेकडून ४ ते ५ मीटर रुंद व २० ते ३० मीटर लांबीची जागा १० वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. या कालावधीत उभारणी, संचालन, देखभाल, वीजजोडणी, आवश्यक परवानग्या व सुरक्षा यांची संपूर्ण जबाबदारी निविदाकारावर राहणार आहे.
पर्यावरणपूरकला प्रोत्साहन
ई-व्हेईकल चार्जिंगसाठी आकारले जाणारे दर केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील. तसेच, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यावसायिक जाहिरात करण्यास मनाई असेल. या प्रकल्पामुळे ठाणे शहरात ई-वाहन वापराला चालना मिळून पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या ठिकाणी उभारले जाणार चार्जिंग स्टेशन्स
नौपाडा-कोपरी : मनोरुग्णालय चौक, काशिश पार्क सेवा रस्ता
उथळसर : वृंदावन बस स्टॉप, कचराळी तलाव, आकाशगंगा राबोडी
वागळे इस्टेट : रोड क्र. २२, पासपोर्ट ऑफिसजवळ
लोकमान्य सावरकर नगर : लोकमान्य बस डेपो जंक्शन, पोखरण रोड क्र. १, देवदया नगर
वर्तक नगर : पोखरण रोड क्र. २, गांधी नगर जंक्शन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ
माजिवडा-मानपाडा : आनंद नगर बस स्टॉप, सुविधा भूखंड पातलीपाडा, यूआरसीटी जंक्शन, धर्माचा पाडा
कळवा : सेवा रस्ता, खारेगाव ९० फूट रोड, खारेगाव टोलनाका, आत्माराम चौक
मुंब्रा : मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
दिवा : आयुष्मान आरोग्य केंद्र