ठाणे, बदलापूर, उरण आणि पेण नगरपरिषद/महापालिका निवडणुकांची रंगत सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारी अर्जाची मोठी संख्या दाखल होत असून अनेक ठिकाणी थेट नेत्यांमधील द्वंद्व, आघाड्यांचे सामर्थ्य प्रदर्शन आणि नवीन चेहऱ्यांची एन्ट्री यामुळे या निवडणुकांच्या लढती अधिक रोचक बनल्या आहेत.
ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नावाने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. हा प्रभाग माजी नगरसेवक व आव्हाड यांचे माजी जवळचे सहकारी असलेल्या, सध्या शिंदे सेनेत गेलेल्या मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यामुळे आव्हाड-पाटील आमनेसामने येणार असल्याने लढत चुरशीची ठरणार आहे. ठाण्यात आतापर्यंत शरद पवार गटाकडे ७३ अर्ज दाखल झाले असून पात्र उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
उरण : उरण नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी, शेकाप आणि मनसे एकत्र येत असल्याचे संकेत मिळाले असून नगराध्यक्ष पदासाठी भावना घाणेकर यांनी भव्य मिरवणुकीत अर्ज दाखल केला. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या बालेकिल्ल्यात या आघाडीने उभी केलेली लढत रंगतदार ठरणार आहे. २१ उमेदवारांनीही अर्ज दाखल केले.
पेण : निवडणुकीत शनिवारी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगरविकास आघाडीने माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली पाच उमेदवारांसह पेण नगरपालिका दमदार ताकद दाखवली. यापूर्वी ६ अर्ज दाखल झाले होते. महायुती तुटण्याची चिन्हे, तर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही स्पष्ट होत असल्याने पेणमधील निवडणूक यंदा अधिक चुरशीची होणार आहे.
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत पहिल्या चार दिवसांत एकही अर्ज न आल्यानंतर पाचव्या दिवशी तब्बल ११ अर्ज दाखल झाले. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अरुण सुरवळ हे यंदाच्या निवडणुकीतील पहिले अर्जदार ठरले. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करत स्पर्धा वाढवली आहे. सोमवार अर्जाचा शेवटचा दिवस असून रविवारीही अर्ज दाखल करता येणार असल्याने पुढील दोन दिवसांत अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
प्रियांका दामले यांना अधिकृत उमेदवारी
प्रभाग क्रमांक ६-अ साठी महायुतीतर्फे प्रियांका आशिष दामले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार), भाजप आणि RPI यांच्या आघाडीकडून दिलेल्या बी-फॉर्मसह दामले निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. संघटन बांधणी, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक संपर्कामुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले.