जीवनदायी ठरतंय ठाणे सिव्हिल रुग्णालय...; तीन वर्षांत १७,३३० यशस्वी शस्त्रक्रिया 
ठाणे

जीवनदायी ठरतंय ठाणे सिव्हिल रुग्णालय...; तीन वर्षांत १७,३३० यशस्वी शस्त्रक्रिया

गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ठाणे जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालय हे विश्वासाचे आरोग्य केंद्र बनत आहे. नव्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इमारतीचे काम सुरू असल्याने वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या जागेतून सेवा देतानाही रुग्णालयाने उपचारांचा दर्जा कायम ठेवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Swapnil S

ठाणे : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ठाणे जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालय हे विश्वासाचे आरोग्य केंद्र बनत आहे. नव्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इमारतीचे काम सुरू असल्याने वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या जागेतून सेवा देतानाही रुग्णालयाने उपचारांचा दर्जा कायम ठेवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ६ जून २०२३ ते ३० जून २०२६ या कालावधीत रुग्णालयात १७,३३० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. त्यामध्ये १०,८२१ मोठ्या आणि ६,५०९ लहान शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत.

अलीकडेच महिलेवर पाठीच्या मणक्याची तीन तासांची अत्यंत गुंतागुंतीची स्पाईन शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असताना सिव्हिल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. तसेच तंबाखूच्या सेवनामुळे जिभेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कमांडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरीत्या पूर्ण करून रुग्णाला दिलासा दिला. जन्मतः हाताची बोटे चिकटलेल्या सहा वर्षीय मुलीवर प्लास्टिक सर्जरीद्वारे पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्यात आली. उपचार अशक्य वाटत असलेल्या अनेक रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालय खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे.

रुग्णालयात लेप्रोटॉमी, हर्निया, सिझेरियन, अस्थिरोग, नेत्र, दंत, कान-नाक-घसा तसेच लेझर आणि दुर्बीणद्वारे विविध शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जात आहेत.

रुग्णालय तात्पुरत्या ठिकाणी असले तरी दर्जेदार आणि अखंड रुग्णसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण वैद्यकीय पथक सातत्याने कार्यरत आहे.
डॉ. कैलास पवार, (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले