ठाणे

जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या; मोहित कंबोज यांनी केली चौकशीची मागणी

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांचे अंगरक्षक वैभव कदम यांचे नावदेखील आरोपी म्हणून आहे. त्यामुळे या आत्महत्येवर मोहित कंबोज यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, वैभव कदम हे मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. करमुसे मारहाण प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या वैभव कदम यांची पोलिसांकडून चौकशीदेखील सुरु होती. दरम्यान, यामध्ये, 'माझी या मारहाणीत काही चूक नाही' असे वारंवार सांगितले होते. या सर्व प्रकरणावरून आता मोहित कंबोज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मोहित कंबोज भारतीय यांनी मनसुख हिरेन २.० असे संबोधित करत ट्विट केले की, "ही आत्महत्या नाही तर हत्या आहे" असे म्हणत वैभव कदम यांच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, "मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करतो की या वैभव कदम आत्महत्या प्रकरणात लगेच एफआयआर दाखल झाली पाहिजे. जे पोलीस आपली रक्षा करतात, तेच सुरक्षित नाहीत. त्यांनाच न्याय मिळाला नाही तर मग सामान्य जनतेचे काय?" असा सवाल त्यांनी केला आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा