ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून महापालिका हद्दीतील ५८ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून महापालिका हद्दीतील ५८ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही अनेक शाळा सुरू असल्याचे आढळून आल्याने शिक्षण विभागाने ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दिवा परिसरातील शाळांची संख्या सर्वाधिक आहे.

मागील शैक्षणिक वर्षात शहरात ८१ अनधिकृत शाळा कार्यरत होत्या. महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या कारवाईमुळे या शाळांची संख्या २३ ने घटून ५८ वर आली असली, तरी अद्यापही अनेक ठिकाणी अशा शाळा सुरू असल्याचे दिसून आले आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या ५३ शाळांचा समावेश असून, हिंदी माध्यमाच्या तीन आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळा आहेत. या शाळांमध्ये आयसीएसई, सीबीएसई, आयबी तसेच राज्य मंडळाच्या नावाखाली प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये शाळेला अधिकृत मान्यता असल्याचा भास निर्माण करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक ४३ शाळा दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत आहेत, तर कळवा, मानपाडा-माजिवडा आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी दोन शाळा असून, मुंब्रा आणि वर्तकनगर परिसरात प्रत्येकी एक अनधिकृत शाळा असल्याची नोंद शिक्षण विभागाने केली आहे.

मागील शैक्षणिक वर्षात महापालिका हद्दीतील ८१ अनधिकृत शाळांमध्ये सुमारे १९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावर्षी ही संख्या कमी होऊन ५८ वर आली असली, तरी अनधिकृत शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांविरोधात शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पालकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाशी किंवा विष्णुनगर-नौपाडा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.
मिताली संचेती, उपायुक्त शिक्षण विभाग

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२

एकच शेतजमीन अनेकांना विकली; ३५ जणांना ११.८५ कोटींचा गंडा, नांदेडमध्ये तिघांना अटक