ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला आठ दिवसांची मुदत; वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली छायाचित्र : दीपक कुरकुंडे
ठाणे

ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला आठ दिवसांची मुदत; वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली

ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कडक इशारा दिला आहे.

Swapnil S

ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कडक इशारा दिला आहे.

पुढील आठ दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा झाली नाही, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बुधवारी त्यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसाळ्यातील पूर्वतयारी, बचावकार्य आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढत, आपत्तीच्या काळात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत बजावले.

आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले. त्यांच्या जागी केदार पाटील यांची नवीन वृक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात मनुष्यबळ, यंत्रसामग्री किंवा अन्य आवश्यक साधनसामग्रीची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यकतेनुसार यंत्रणा वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

'आपत्तीच्या काळात नागरिकांचा मृत्यू होता कामा नये'

शहरातील धोकादायक वृक्षांची तातडीने छाटणी करण्यात यावी, तसेच तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून वृक्षांचे वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट करून दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. आपत्तीच्या काळात नागरिकांचा मृत्यू होता कामा नये. जीवितहानी टाळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ठाणे शहरात आतापर्यंत सरासरी ४३ टक्के पावसाची नोंद झाली असून, आगामी काही दिवसांतही मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता सर्व यंत्रणांनी अधिक सतर्क राहून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील एसटी बसेस इलेक्ट्रिक होणार; परिवहन मंत्र्यांची माहिती

मृत जनावरांचा मुद्दा स्थायी समितीत गाजला; पाच वर्षांत किती जनावरे दगावली - सदस्यांचा सवाल

चर्च मिशनरीच्या जमिनींची तीन महिन्यांत चौकशी; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

धरणक्षेत्रात पावसाची 'टी-२०'! २४ तासांत पाणीसाठ्यात १२.४४ टक्क्यांनी वाढ; राखीव उपशाला ब्रेक, तुळशी तलावही ओव्हरफ्लो!

पाताळगंगेत HPCL चे ३,००० गॅस सिलेंडर वाहून गेले; फुकटात टाक्या नेण्यासाठी नागरिकांची गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचं आवाहन