ठाणे : ठाणेकरांचा टीएमटीचा प्रवास सुखद आणि गारेगार होणार आहे. लवकरच ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात १५ ऑगस्टच्या दिवशी २५ नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून १०० बस परिवहन सेवेत समाविष्ट होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात २५ बस दाखल होतील. या सर्व बस वातानुकूलित असणार आहेत. तर उर्वरित बस टप्प्याटप्प्याने परिवहन सेवेत दाखल होणार आहेत.
इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक आहेत. विशेष म्हणजे डिझेलच्या तुलनेत यांचा खर्च कमी येतो. इलेक्ट्रिक बस पायी प्रति किमी साधारण २५ रुपयांची बचत होते आहे. एक इलेक्ट्रिक बस दिवसाला सुमारे १०० ते १२० किमी अंतर धावते. याचा विचार केल्यास एका इलेक्ट्रिक बस मागे दिवसाला साधारण अडीच हजार तर महिन्याला ७५ हजार रुपयांची बचत होते. त्यानुसार पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून १०० नवीन गाड्या ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत. यासर्व इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असणार आहेत. यात नऊ मीटरच्या ६० आणि १२ मीटरच्या ४० बसचा समावेश असणार आहे.
या बस यापूर्वी मार्च अखेरीपर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या. मात्र त्याला विलंब झाला आहे. परंतु आता येत्या १५ ऑगस्टला ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.