कार भेटप्रकरणी मीनाक्षी शिंदेंविरोधात तक्रार संग्रहित छायाचित्र
ठाणे

कार भेटप्रकरणी मीनाक्षी शिंदेंविरोधात तक्रार

ठाणे महापालिकेच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी महापालिकेच्या कंत्राटदाराकडून आलिशान कार भेट म्हणून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार दाखल केली.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी महापालिकेच्या कंत्राटदाराकडून आलिशान कार भेट म्हणून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार दाखल केली. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच नगरसेवकपदाबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जेया यांनी पत्रकार परिषदेत तक्रारीची माहिती दिली. तक्रारीसोबत वाहनाची कागदपत्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ सादर केल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कारची खरेदी कोणी केली, तिचा प्रत्यक्ष ताबा कोणाकडे होता आणि वापर कोण करीत होते, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

कंत्राटदाराच्या नावावर कारची नोंद

एप्रिल २०२५ मध्ये ही कार मीनाक्षी शिंदे यांना भेट दिल्याचा आरोप आहे. मात्र, वाहन नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये कार कांचन कन्स्ट्रक्शनशी संबंधित महापालिका कंत्राटदाराच्या नावावर असल्याचे नमूद आहे. कार वितरणावेळी शोरूममध्ये लावण्यात आलेल्या अभिनंदन फलकावर शिंदे यांचा उल्लेख असल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे. दरम्यान, २९ डिसेंबर २०२५ रोजी सत्यापित केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी स्वतःच्या नावावरील वाहनांच्या रकान्यात ‘निरंक’ अशी नोंद केली आहे. त्यामुळे कारची मालकी, वापर आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंत्राटांचीही चौकशी करण्याची मागणी

शिंदे यांच्या प्रभागातील विशेष अर्थसंकल्पीय तरतुदींमधून मंजूर झालेल्या कामांसह महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबतही तक्रारीत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या कामांच्या निविदा प्रक्रिया, कंत्राटवाटप, कामांचा दर्जा आणि देयकांची तपासणी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कथित कार भेट आणि कंत्राटांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी अजय जेया यांनी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूलपाठोपाठ आता गोकुळचे दूधही महागणार? दरवाढीच्या हालचाली सुरू

विलीनीकरणाची माझ्यासमोरच चर्चा; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त