ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. १५, १८, १९, २० आणि २५ सप्टेंबर रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. संबंधित दिवशी विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. त्यातच ठाणे शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जात असल्याने बाहेरील भागांतून ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.
अनंत चतुर्दशीला विशेष निर्बंध
२५ सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विसर्जनाचे दिवस वगळता इतर दिवशी अवजड वाहनांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे शहरातून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पाच दिवस कडक निर्बंध
१५ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, १८ सप्टेंबर रोजी पाच दिवसांचे विसर्जन, १९ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती, २० सप्टेंबर रोजी सात दिवसांचे विसर्जन आणि २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या सर्व दिवशी रात्री १२.०१ वाजल्यापासून संबंधित विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहू वाहनांना ठाणे शहरातील मार्गांवर प्रवेश बंद राहणार आहे.