ठाणे : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी ठाणे पोलिसांनी विसर्जन घाट, मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ठाणे, कल्याण-बदलापूर आणि भिवंडी परिसरात सुमारे ४,५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १,०७६ सार्वजनिक आणि १ लाख ६५ हजार ४४८ घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून, त्यापैकी ७९६ सार्वजनिक आणि ४० हजार २६७ घरगुती गणेशमूर्तीचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. यासाठी १९३ विसर्जन केंद्रे आणि ६६ गणेशमूर्ती दान केंद्रे निश्चित आली आहेत. मिरवणुकीचे मार्ग आणि येण्या-जाण्याची व्यवस्था करण्यात आली असून घाटांवर निर्माल्य कलश, वाहनतळ, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल आणि प्रकाश व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
ध्वनिप्रदूषणावरही पोलिसांची नजर
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत ध्वनिप्रदूषणविरोधी पथके कार्यरत राहणार आहेत. या पथकांना ध्वनिमापक यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या मंडळांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
१९३ विसर्जन केंद्रांवर व्यवस्था
कळवा येथील खारेगाव रेतीबंदर, मासुंदा तलाव, उपवन, कोलशेत खाडी, नदी नाका, वर्तकनगर परिसरातील घाट, काल्हेर खाडी, दुर्गाडी गणेश घाट, मोठागाव रेतीबंदर आणि उल्हास नदी परिसरातील घाटांचा यामध्ये समावेश आहे. महापालिकेने विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश, वाहनतळ, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध केली आहे.
गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी शहरात तसेच विसर्जनस्थळांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशभक्तांनी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.योगेश चव्हाण, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २,०३२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये सात पोलीस उपायुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ६५ पोलीस निरीक्षक तसेच २२९ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. याशिवाय २० स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीपी, दोन क्यूआरटी, ११३ होमगार्ड, १४८ वॉर्डन आणि एसआरपीएफचे प्लाटून तैनात करण्यात आले आहेत.
विसर्जन घाटांवर सीसीटीव्हीची नजर
वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, नेरुळ-चिंचोली, करावे, दारावे, सीबीडी-आग्रोळी, ऐरोली, रबाळे आणि दिघा आदी प्रमुख विसर्जनस्थळांसह पनवेल व उरण परिसरातील घाटांवर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाच्या १६ विसर्जन घाटांवर पोलिसांकडून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकांवर सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटर तसेच ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.
सहा फुटांपर्यंतच्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सहा फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम विसर्जन तलाव किंवा कृत्रिम जलसाठ्यात करणे आवश्यक आहे. सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीसाठी लागू असलेल्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करता येणार आहे. हा नियम यंदाही लागू राहणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेने नागरिक, गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. निर्माल्य स्वतंत्र संकलन केंद्रात जमा करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.