ठाणे : ठाणे शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था कोलमडली असून शहरातील कचरा विल्हेवाट प्रकल्पांना ठिकठिकाणी नागरिकांचा विरोध वाढत चालला आहे. विशेषत: डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे ठप्प झाल्याचा फटका कळवा, मुंब्रा, दिवा आणि डायघर परिसराला बसत आहे. कचरा संकलनाची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या भागात कचऱ्याचे प्रचंड ढिग साचले आहेत. दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या रोगराईच्या धोक्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे.
डायघर प्रकल्पावरील विरोध आणि कचऱ्याच्या वाढत्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी दोन दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयासमोर कळव्यातील कचरा आणून निषेध आंदोलन केले. तसेच माजी नगरसेवक अश्रफ ‘शानू’ पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत निषेध नोंदवला.
भाजपने पालिका घनकचरा विभागावर जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे सांगितले. तत्काळ कचरा उचलणी सुरू करा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा भाजपने दिला.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढत आहे. विशेषतः डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक भागांत नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून रस्ता काढत जावे लागत असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी असून, कचरा व्यवस्थापनाच्या धोरणात्मक उपाययोजनांकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशीही मागणी होत आहे.
भाजपचे दिव्यात कचरा टाकून आंदोलन
शरद पवार गटाच्या आंदोलनानंतर आता भाजपही आक्रमक झाली असून, गेल्या ८ ते १० दिवसांपासून दिवा परिसरात कचरा उचलला जात नाही, असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिवा प्रभाग समिती कार्यालयातील घनकचरा विभागाच्या प्रवेशद्वारात कचरा टाकून जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंत भोईर, दिवा-शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.