ठाणे

Thane : घोडबंदर रस्त्याचे काम रखडणार; डिसेंबरपर्यंत विलीनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आयुक्त सौरभ राव यांची असमर्थता

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला दावा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खोडून काढला आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर येथे नेहमी होणारी वाहतूककोंडी थांबवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्ता विलीनीकरणाचे काम पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाले आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन घोडबंदरकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, असा दावा पुन्हा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. परंतु त्यांचा हा दावा आता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खोडून काढला आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार नाही. हे काम फेब्रुवारी २०२६ अखेर पूर्ण होईल, असे राव यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ या रस्त्याच्या कामाची डेडलाइन दोन महिन्यांनी वाढणार असल्याचेच दिसत आहे.

ठाणे महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात सरनाईक यांनी सोमवारी विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या बैठकीत घोडबंदर रस्त्याचे काम वेगाने सुरू असून ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला. परंतु त्यांचा दावा महापालिका आयुक्तांनी खोडून काढला आहे. येथील महत्त्वाची कामे जरी डिसेंबर अखेर पूर्ण होणार असली तरी काही किरकोळ कामे शिल्लक राहणार असून ती कामे पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घोडबंदर भागाची वाहतूककोंडी कमी होण्यासाठी सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेण्यात असून हे काम कापुरबावडी ते गायमुखपर्यंत आहे. हे अंतर १०.५० किमीचे आहे. घोडबंदर मार्गावरील या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च केला जात आहे. या कामात २१९६ वृक्षांची तोडण्यात आले. विजेचे खांब व वीजवाहिन्या बदलण्यासाठी ७० कोटींचा खर्च येणार आहे.

दरम्यान, विविध कामामुळे घोडबंदर मार्गावर अनेक ठिकाणी बॉटल नेक झाल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली. कोंडी सोडविण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथील स्थानिक रहिवाशांनी घोडबंदरच्या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी केली. घोडबंदर मार्गावरी कोंडी डिसेंबर नाही तर फेब्रुवारी २०२६ मध्येच फुटणार असल्याचे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

पायाभूत सुविधांच्या कामांमुळे विलंब

कापुरबावडी ते गायमुख अशा पद्धतीने हे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सेवा रस्त्याच्या एकच मार्गिका सुरू आहेत. काही ठिकाणी मेट्रोचे कामही सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे, तर रात्री ३ नंतर अवजड वाहनांची वाहतूक वाढून गायमुख घाट जाम होतो. ती कोंडी फोडण्यासाठी सकाळी ८ ते ९ वाजतात. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली निर्दोष; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, तात्काळ सुटका होणार

Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय

Mumbai : शासकीय कार्यालयांमुळे BMC ला फटका; थकवला तब्बल ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

बीएलए नियुक्तीत उदासीनता! भाजप वगळता अन्य पक्षांत निरुत्साह; मविआसह मनसेची नेमणुकीकडे पाठ

पादचारी सुरक्षेसाठी कृती आराखडा करा; मुंबई, पुणे, नागपूर महानगरपालिकांना राज्य सरकारचे निर्देश