ठाणे : कोलशेत रोड परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूळ, माती आणि चिखलाचा त्रास वाढला असताना ठाणे महापालिकेने बड्या विकासकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. बांधकामस्थळी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोढा डेव्हलपर्स, जेएसपीएल मशिन बिल्डर्स, गोदरेज असेंड, ओबेरॉय रिअल्टी तसेच बहुराष्ट्रीय कंपनी एन्ड्रेस+हाउझर इंडिया प्रा. लि. यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. काही प्रकरणांत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी कोलशेत परिसरातील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचा भंग होत असल्याचे पुरावे महापालिकेकडे सादर करून तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने संबंधित प्रकल्पांची पाहणी केली. या पाहणीत बांधकामस्थळांवरून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या चाकांना लागलेला चिखल आणि माती थेट सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याचे आढळले. तसेच अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकांची स्वच्छता करण्यासाठी टायर वॉशिंगची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
एन्ड्रेस+हाउझर इंडिया प्रा. लि.च्या प्रकल्पाची १९ ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. बांधकामस्थळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती पसरल्याचे आढळून आले. त्यामुळे कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. लोढा डेव्हलपर्सच्या ‘क्राउन कोलशेत’ प्रकल्पाची १८ ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. याप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, सात दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास काम बंद करण्याची कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. वक्रतुंड कोलशेत येथील जेएसपीएल मशिन बिल्डर्सच्या प्रकल्पातही टायर वॉशिंगची सुविधा नसल्याचे आढळले. सार्वजनिक रस्त्यावर वाहने धुतल्याने धूळ आणि प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने कंपनीवर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गोदरेज असेंड आणि ओबेरॉय रिअल्टीच्या फॉरेस्टविले प्रकल्पांनाही प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नियमभंग केल्यास परवाने रद्द करणार
बांधकाम प्रकल्पांनी प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास वापर परवाने रद्द करण्यासह फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी योग्य बॅरिकेडिंग, बांधकाम सुरू असलेल्या भागाला आच्छादन, नियमित पाण्याचा फवारा, अँटी-स्मॉग गन, टायर वॉशिंग सुविधा आणि बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना पूर्णपणे झाकणे बंधनकारक आहे. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सरआधारित मॉनिटर बसविण्याचेही निर्देश आहेत.
‘५० हजारांचा दंड अपुरा’
महापालिकेच्या कारवाईचे स्वागत करताना पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांना ५० हजार रुपयांचा दंड पुरेसा परिणामकारक ठरणार नसल्याचे म्हटले. वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि ठाणेकरांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर महापालिकेने सातत्याने लक्ष ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.