ठाणे : ठाणे महापालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात गुरुवारी सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले. महासभेतील प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेवर भाजपचे नगरसेवक सुरेश कांबळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे काही काळ सभागृहात अस्वस्थ शांतता पसरली. या प्रश्नामुळे शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांचीही कोंडी झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली.
जानेवारी २०२६ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात प्रजा फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कामकाज नियमावली, संविधान, नगरसेवकांचे अधिकार, कर्तव्ये आणि महासभेच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात भाजपचे नगरसेवक सुरेश कांबळे यांनी महासभेतील प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेबाबत थेट प्रश्न उपस्थित केला.
महासभेतील कोणताही प्रस्ताव मतदानाद्वारे मंजूर केला जातो की केवळ ‘मंजूर... मंजूर...’ असे घोषित करून संमत केला जातो? असा सवाल त्यांनी केला. यानंतर कांबळे यांनी, मग आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या महासभेत ज्या पद्धतीने प्रस्ताव मंजूर करण्यात आले, ते कायदेशीर मानायचे की बेकायदेशीर? असा थेट प्रश्न उपस्थित करताच सभागृहात काही काळ शांतता पसरली. शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येही कुजबूज सुरू झाली.
अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघड
ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे) आणि भाजप सत्तेत एकत्र असले, तरी महासभेतील कामकाजाची पद्धत, प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया आणि चर्चेविना निर्णय घेतले जात असल्याच्या मुद्द्यावरून यापूर्वीही दोन्ही पक्षांत मतभेद झाले आहेत. गुरुवारीच्या या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला असून, आगामी महासभांमध्ये या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.