ठाणे

Thane Metro : मेट्रोवरून भाजप - शिंदे सेनेत श्रेयवाद सुरू

ठाण्यात एकीकडे मेट्रोची ट्रायल रन पार पडली तर दुसरी कडे मेट्रोच्या कामाचे श्रेय कोणाचे या वरून भाजप आणि शिंदे सेनेत आता जुंपली असल्याचे पाहायला मिळाले.

Swapnil S

ठाणे : ठाण्यात एकीकडे मेट्रोची ट्रायल रन पार पडली तर दुसरी कडे मेट्रोच्या कामाचे श्रेय कोणाचे या वरून भाजप आणि शिंदे सेनेत आता जुंपली असल्याचे पाहायला मिळाले.

२०१४ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रोची प्रतिकृती दिलेली फ्रेम लावण्यात येणार असल्याचे सांगत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न यावेळी शिंदेसेनेकडून करण्यात आला. तर, मी मुख्यमंत्री असताना खऱ्या अथार्ने मेट्रोला चालना मिळाली असल्याचे विधान करून उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी हे श्रेय आपले असल्याचे यावेळी सूचित केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर शिवसेनेने रस्त्यावर पोस्टर्स लावून श्रेय घेण्याचा केला प्रयत्न केल्याचे दिसून आले.

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख येथे पार पडली. यावेळी शिंदे सेनेत आणि भाजपमध्ये काहीशी श्रेयवादाची लढाई झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री येणार म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गायमुख येथील मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. यावेळी शिंदे सेनेचा एकही पदाधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे दिसून आले. शिंदे सेनेचे पदाधिकारी आपल्या आधीच याठिकाणी पोहचतील अशी शक्यताही भाजपचे पदाधिकारी वर्तवित होते. मात्र त्याठिकाणी पदाधिकारी न दिसल्याने शिंदे सेनेत नेमके काय सुरु आहे. अशी चर्चा देखील भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी करतांना दिसून आले.

त्यातही कार्यक्रमस्थळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक आणि एक ते दोन स्थानिक पदाधिकारी शिंदे सेनेचे दिसून आले. मात्र भाजपचे कोकणपदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार शिवाजी पाटील, माजी शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, कृष्णा पाटील, मृणाल पेंडसे आदींसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची एकही संधी सोडली नाही. दुसरीकडे शिंदे सेनेकडून केवळ बॅनरबाजीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

‘मुख्यमंत्री आगे बढो’ची घोषणाबाजी

मुख्यमंत्री येणार म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गायमुख येथील मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणाही भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. यावेळी शिंदे सेनेचा एकही पदाधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे दिसून आले.

मेट्रोचा पूर्णत्वाचा कालावधी

गायमुख ते विजय गार्डन जंक्शन असे ४ मेट्रोचे स्थानके डिसेंबर २०२५ च्या अखेरीस खुले करण्यात येणार आहेत. त्यानंतर १० स्थानके ही एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

टप्पा दोन - कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर ११ किमी ११ स्थानके एकूण २१ स्थानके ऑक्टोबर २०२६

टप्पा ३ - गांधी नगर ते वडाळा १२ किमी, ११ स्थानके, एकूण ३२ स्थानके ऑक्टोबर २०२७

ठाणे मेट्रो मार्गिका ४-अ वरील स्थानक

गायमुख, गोवनीपाडा, कासारवडवली, विजय गार्डन, डोंगरी पाडा, टिकुजी नी वाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी जंक्शन

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही