ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराची तब्बल २४५.५३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकीत असलेल्या ६ हजार ६६६ मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्याकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तरीही कर भरण्यास प्रतिसाद न दिल्यास संबंधितांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.
मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षातील करमागणी, थकबाकी आणि प्रत्यक्ष वसुलीचा आढावा घेताना प्रत्येक प्रभाग समितीने स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नोटीस बजावल्यानंतरही थकबाकीदारांनी मालमत्ता कराचा भरणा केला नाही, तर संबंधित मालमत्तांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
६,६६६ थकबाकीदार प्रशासनाच्या रडारवर
एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकीत असलेल्या ६ हजार ६६६ मालमत्ताधारकांकडे एकूण २४५.५३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार आहेत. संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यासोबतच प्रत्यक्ष भेट देऊन कर भरण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
प्रत्येक प्रभाग समितीला मालमत्ता कर वसुलीचे स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करून दिले जाणार आहे. त्यानुसार दैनंदिन नियोजन आणि नियमित आढाव्याच्या माध्यमातून वसुलीला गती दिली जाणार आहे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्याने महसूल वाढविण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. वसुलीच्या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.सौरभ राव, आयुक्त ठाणे महानगरपालिका
नव्या मालमत्तांचाही शोध घेणार
थकीत कराच्या वसुलीबरोबरच नव्याने करआकारणीस पात्र असलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यावरही प्रशासन भर देणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीने आपल्या हद्दीतील अशा मालमत्तांची माहिती संकलित करून त्यांना मालमत्ता कराच्या कक्षेत आणावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय व्हॉट्सअॅप, एसएमएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करदात्यांना नियमित संदेश पाठवून ऑनलाइन करभरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.