ठाणे

Thane : ठाणे महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली; MNSकडून आयुक्तांना जाब

मागील कित्येक वर्षांपासून रखडलेली ठाणे महानगरपालिका (ठामपा) ची नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला होता.

Swapnil S

ठाणे : मागील कित्येक वर्षांपासून रखडलेली ठाणे महानगरपालिका (ठामपा) ची नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला होता. त्यानुसार क व ड वर्गातील १,७७३ पदे कायमस्वरूपी भरण्यात येणार असून, यामध्ये आरोग्य, अग्निशमन विभागासह इतर महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. यासाठी पालिकेला ७५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेचा प्रत्यक्ष मार्ग अद्यापही मोकळा झालेला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या संदर्भात गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून भरती प्रक्रिया का रखडली, याबाबत जाब विचारण्यात आला आहे. ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ साली झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. महापालिकेत शिक्षण मंडळासह ९,०८८ तर परिवहन सेवेत सुमारे २,६०० कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या आता २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधात ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली होती; मात्र त्यांची भरती अद्याप झालेली नाही. अग्निशमन दलातील महत्त्वाची पदे देखील अनेक वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह अग्निशमन केंद्र अधिकारी, चालकांची १९४ आणि फायरमनची ३६० पदे रिक्त होती. यापैकी आता चालकांची २०७ तर फायरमनची ३८१ पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे अग्निशमन विभागाचे बळ वाढणार आहे.

बेरोजगार तरुण-तरुणींच्या भावनांशी खेळ

मात्र सप्टेंबर २०२५ नंतर फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंतही भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नसल्याने मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहरप्रमुख रवी मोरे यांनी आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देऊन याबाबत जाब विचारला आहे. या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येक अर्जदाराकडून सुमारे १,८०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज स्वीकारल्यानंतरही परीक्षेची तारीख, निवड प्रक्रिया अथवा पुढील कार्यवाहीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या विलंबामुळे बेरोजगार तरुण-तरुणींच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत असून, अनेक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मधल्या काळात महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने भरती प्रक्रियेचे काम करता आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता प्राप्त अर्जांची छाननी करून पुढील प्रक्रिया प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे.
गजानन गोदेपुरे - उपायुक्त, मुख्यालय - ठामपा

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

CJP Protest Delhi : जागा सोडू नका; मनोज जरांगे यांचा सल्ला

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण