प्रातिनिधिक फोटो
ठाणे

ठाणे महापालिकेची ४१७ कोटींची कर वसुली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३९ कोटींची अधिक वसुली

मालमत्ता कर १० दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत १० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती.

Swapnil S

ठाणे : मालमत्ता कर १० दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत १० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र ठाणे महापालिकेच्या वतीने ही कालमर्यादा वाढवून हा कालावधी १५ दिवस केल्याने याचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला मालमत्ता कर वसुलीमध्ये झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सवलतीचा कालावधी वाढवल्याने यामधून तब्बल ४० कोटींची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता विभागाने दिली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३९ कोटींची अधिक वसुली झाली असून ८ सप्टेंबरपर्यंत ४१७ कोटींची वसुली झाली असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा ८१९ कोटी ७१ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात या विभागाला ७५० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. मात्र या विभागाने ७०३ कोटी ९३ लाख रुपयांची वसुली केली होती. तेव्हा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक २२० कोटी ४१ लाख रुपयांची वसुली झाली. तर कळव्यात सर्वात कमी २४ कोटी ७८ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात सुरवातीपासूनच महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दुष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्याची प्रचिती म्हणजे १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ९ प्रभाग समिती स्तरावर एकूण ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक २४ कोटी ९ लाख रुपये मानपाडा-माजिवडा तर सर्वात कमी १ कोटी १५ लाख रुपये वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत वसूल झाले होते.

आता ८ सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापोटी ठाणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल ४१७ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ही वसुली ३७८.२६ कोटी इतकी झाली होती. यावेळी ३९ कोटींची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. सर्वाधिक १४६.६४ कोटींची मालमत्ता वसुली ही माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात झाली असून या ठिकाणी ऑनलाईनसाठी मिळालेला प्रतिसाद आणि भौगोलिक स्थितीमुळे या ठिकाणी वसुली जास्त असल्याची माहिती मालमत्ता विभागाने दिली आहे. तर खाडीच्या पलीकडे कळवा, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात कमी वसुली झाली असल्याचे आकडे वारीवरून उघड झाले आहे.

प्रभाग समितीनिहाय वसुली

प्रभाग समिती वसुली (कोटींमध्ये)

उथळसर ३०.९७

नौपाडा-कोपरी ५८.२०

कळवा १४.०७

मुंब्रा १३.२३

दिवा १५.१४

वाग १४.१५

लोकमान्य-सावरकर १६.२१

वर्तकनगर ७३.६४

माजिवडा-मानपाडा १४६.६४

इतर ३४.६०

एकूण ४१७.४६

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी