ठाणे

शहरांच्या सुरक्षेला ठाणे महापालिकेचा अडसर? पोलिसांच्या CCTV बसवण्याच्या कामाला ब्रेक

शहरांमधील गुन्हेगारीला आळा बसावा तसेच शहरे सुरक्षित व्हावी यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्हीचे जाळे बसवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून तयार करण्यात आला.

Swapnil S

अतुल जाधव/ठाणे

शहरांमधील गुन्हेगारीला आळा बसावा तसेच शहरे सुरक्षित व्हावी यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्हीचे जाळे बसवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून तयार करण्यात आला. विशेष म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येत असलेल्या इतर महापालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला परवानगी दिली असताना ठाणे महापालिकेकडून मात्र अद्याप या कामासाठी हिरवा कंदील मिळालेला नाही. ठाणे महापालिकेच्या परवानगी अभावी ठाणे पोलिसांना हे काम सुरू करता येत नसल्याने सुरक्षेसंबंधी पालिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजाराहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी तयार केला आहे. या पाच शहरांमध्ये १ हजार ९९७ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. शहरातील सिग्नल परिसर, मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय तसेच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणे शक्य होणार आहे.

ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे त्या शहरांमध्ये कॅमेरे बसवण्यासाठी रस्ते खोदणे तसेच इतर कामांसाठी संबंधित महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. इतर महापालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नसल्याची माहिती ठाणे पोलिसांकडून मिळाली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेशी संपर्क केला असता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठाणे पोलिसांचा प्रस्ताव आला असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ३०० किमीचे काम असून हे काम करण्यासाठी ठाणे पोलिसांना आम्ही काही पर्याय दिले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. यामध्ये खोदकाम करताना कमीत कमी नुकसान व्हावे, असा यामागे उद्देश असून त्यामुळे अद्याप परवानगी दिली नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेच्या परवानगी अभावी ठाणे पोलिसांना काम सुरू करता येत नसल्याने सुरक्षेच्या कामाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये...

या प्रस्तावानुसार स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे, लांबून तसेच अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे, तर वाहनांचा वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेरे अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार असून ते ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी नियंत्रण कक्षात बसून संपूर्ण शहरातील गुन्हेगारीवर तसेच वाहतूककोंडीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता का?

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात ठाणे महापालिकेने शहरात १७५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असली तरी भौगोलिक रचनेच्या तुलनेत शहरात कॅमेऱ्यांची संख्या पुरेशी नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरात स्मार्टसिटी अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ठाणे आणि कल्याण वगळता कल्याण वगळता ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा