ठाणे : तब्बल ३० वर्षांनी पदोन्नती मिळाली परंतु पदोन्नतीचा आनंद घेता येत नाही अशी स्थिती पालिकेतील कर्मचाऱ्यांची झाली आहे. वरचा हुद्दा मिळून देखील कनिष्ठ पदावर काम करावे लागत असल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
तब्बल ३० वर्षांनी पालिकेला जाग आल्यानंतर अखेर ठाणे महापालिकेत पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेकांना पदोन्नती देण्यात आली. त्यात वरिष्ठ लिपिक ते उपाधीक्षक पदी पदोन्नती मिळालेल्या ५४ जणांना अद्यापही त्यांचा कार्यभार मात्र मिळू शकला नसल्याची माहिती समोर आली आहे. हीच अवस्था लिपिकांची झाली असून ४९ जणांना वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती देऊनही त्यांना नवीन कार्यभार मिळू शकलेला नाही. या कर्मचाऱ्यांची सुमारे एक महिन्यापूर्वी पदोन्नती झाली होती. परंतु आजही हे कर्मचारी लिपिकाचेच काम करीत असल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेतून दरमहा २५ ते ४५ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यात आता मागील कित्येक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नव्हती. अखेर पालिकेने यंदा रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग देखील मोकळा केला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५८ जणांना महापालिकेने पदोन्नती दिली आहे. त्यानंतर मागील कित्येक वर्षं रखडलेला भरतीचा मार्ग देखील आता प्रशस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशातच मागील महिन्यात ठाणे महापालिकेने लिपिक पदी काम करीत असलेल्या ४९ जणांना वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. शिवाय वरिष्ठ लिपिक ते उपाधीक्षक पदावर ५६ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु त्यांची ही पदोन्नती सध्या केवळ नावापूर्तीच राहिल्याचे चित्र दिसत आहे. मागील महिनाभरापासून १०५ जणांना पूर्वीचेच काम करावे लागत आहे.
जोपर्यंत वरिष्ठ लिपिक हे उपाधीक्षक पदी रूजू होत नाहीत तोपर्यंत लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता येत नसल्याचे चित्र दिसत आहे. आधीच पालिकेत कर्मचाऱ्यांची वानवा असताना देखील पदोन्नती देण्यात आल्यानंतर केवळ वरिष्ठ पातळीवर विभागवार जागा रिक्त नसल्याने त्यांचे पद स्थापन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. तर सध्या जे कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहेत, त्यांनी त्याच विभागात वरिष्ठ पातळीवर काम सुरू केले असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार
ठाणे महापालिकेत मागील काही वर्षांत २ हजारांहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना एकाच वेळेस अनेक विभागांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे चार ते पाच विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील कामाचा ताण वाढत आहे.