Thane : करवाढीवरून महायुतीमध्येच मतभेद; 'युतीधर्म पाळणार' म्हणत शिवसेनेचा भाजपला इशारा (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

Thane : करवाढीवरून महायुतीमध्येच मतभेद; 'युतीधर्म पाळणार' म्हणत शिवसेनेचा भाजपला इशारा

मालमत्ता करवाढीच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्येच मतभेद उफाळून आले आहेत. गटनेत्यांच्या बैठकीत करवाढीच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर महासभेत मात्र भूमिका बदलणे योग्य नाही, अशा शब्दांत महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह शिंदेसेनेच्या नेत्यांनी भाजपला सुनावले.

Swapnil S

ठाणे : मालमत्ता करवाढीच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्येच मतभेद उफाळून आले आहेत. गटनेत्यांच्या बैठकीत करवाढीच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर महासभेत मात्र भूमिका बदलणे योग्य नाही, अशा शब्दांत महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह शिंदेसेनेच्या नेत्यांनी भाजपला सुनावले. दरम्यान, करवाढीचे समर्थन करत शिंदेसेनेचे गटनेते पवन कदम यांनीही, ‘नियमित कालावधीत करवाढ केली नाही तर महापालिकेची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे,’ असे स्पष्ट केले.

भाजपने करवाढीला विरोध करत शिंदेसेनेवर टीका केल्यानंतर बुधवारी शिंदेसेनेने पत्रकार परिषद घेत भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी शहराचा विस्तार आणि विकासाचा वेग वाढत असताना विकासाची व्याख्याही बदलत असल्याचे सांगितले. ‘ठाणेकरांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक आहे.

‘गटनेत्यांच्या बैठकीत विषयाला मान्यता द्यायची, महासभेतही तो मंजूर करायचा आणि नंतर बाहेर वेगळी भूमिका मांडायची, हे मित्रपक्षाला शोभणारे नाही. महायुतीच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,’ असे पिंपळोळकर यांनी स्पष्ट केले.

उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणार

महापालिकेच्या आर्थिक स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी एमआयडीसीला सुविधा दिल्यानंतर त्यातून महसूल कसा मिळवता येईल, याचा विचार सुरू आहे. मुद्रांक शुल्कातील हिस्सा थेट महापालिकेला मिळावा, जीएसटीमधून अधिक निधी मिळावा, तसेच कळवा रुग्णालयातून शासनाच्या माध्यमातून महसूल मिळविण्याचे पर्याय तपासले जात असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

अडीच लाख घरांना अद्याप मालमत्ता कर नाही

६ लाख ५८ हजार घरांना मालमत्ता कर आकारला जात असून, त्यातून सुमारे एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सुमारे १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अडीच लाख घरांना अद्याप मालमत्ता कर लागू झालेला नाही. ही घरे कराच्या कक्षेत आणल्यास सुमारे ३०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, असा दावा जगदाळे यांनी केला. निवासी मिळकतींसाठी १२ टक्के, तर अनिवासी मिळकतींसाठी २० टक्के वाढ प्रस्तावित असून, त्यातून सुमारे १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.

महासभेत गोंधळ होऊ नये आणि प्रत्येक विषयावर सर्वपक्षीय चर्चा व्हावी, यासाठी गटनेत्यांची बैठक घेऊन अजेंडा निश्चित केला जातो. करवाढीच्या प्रस्तावावरही या बैठकीत चर्चा झाली होती. त्यावेळी सकारात्मक भूमिका होती. मात्र, महासभेत वेगळी भूमिका घेण्यात आली.
शर्मिला पिंपळोळकर, महापौर

‘युतीधर्म पाळणार’

शिंदेसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनीही भाजपच्या भूमिकेवर टीका केली. ‘आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली आणि १०० पार गेलो. सर्वांना सोबत घेऊन साधक-बाधक चर्चा करून निर्णय घेतले जातात. विरोधी पक्षनेते मंजुरी देतात आणि नंतर त्यांचेच नेते विरोध करतात. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर

मुलांना बेदखल करण्याचा पालकांना पूर्ण अधिकार; ज्येष्ठांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला

Mumbai : वांद्रे येथील फुटबॉल मैदानाबाबत याचिकेवर आज सुनावणी

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर