ठाणे : बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर सध्या वाहतूक विभागाकडून कारवाई करत १५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. मात्र उत्पन्नापेक्षा दंडच अधिक असल्याने वाहतूक विभाग वसूल करत असलेल्या या दंडामुळे रिक्षाचालक देखील त्रस्त झाले आहेत. काही रिक्षाचालकांनी तर रिक्षा चालवणेच सोडून देण्याचा विचार केला आहे. हा दंड कमी न झाल्यास संपावर जाण्याचा इशाराही ठाण्यातील रिक्षाचालकांकडून देण्यात आला आहे.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर त्याचबरोबर शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात. या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच ठाणे स्थानकापासून या परिसराचे अंतर देखील जास्त आहे. यासाठी ठाणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी टीएमटीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाही. तसेच मीटर रिक्षाने प्रवास करणे नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण शेअर रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर परिसर, गावदेवी मैदान परिसर, सिडको, मासुंदा तलाव परिसर अशा विविध भागात शेअर रिक्षाचालकांचे थांबे आहेत. केवळ तीन प्रवासी घेऊन वाहतूक करणे शेअर रिक्षाचालकांना परवडत नसल्याने अनेक शेअर रिक्षाचालक बेकायदेशीररीत्या चार प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसून येतात. या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते. रिक्षा न थांबवता मोबाईलमधून फोटो काढला जात असल्याने चलन रिक्षाचालकांच्या मोबाईलवर येत आहे. दररोज असे प्रकार होत असल्याने उत्पन्न कमी आणि दंड जास्त अशी परिस्थिती सध्या ठाण्यातील रिक्षाचालकांची आहे.
त्यामुळे ठाण्यातील रिक्षाचालक आता संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. येत्या ५ ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिला असून यामध्ये रिक्षा संघटनांनी मात्र अधिकृत रित्या पाठींबा दर्शविलेला नाही. मात्र खरंच रिक्षाचालक संपावर गेले तर प्रवाशांचे मात्र हाल होण्याची चिन्हे आहेत.