अतुल जाधव / ठाणे
सर्वपित्री अमावस्येनिमित्त पितरांना तर्पण आणि श्राद्ध करण्यासाठी ठाणे शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने कावळ्यांसाठी अन्न ठेवले होते. घरांमध्ये पंचपक्वान्नांचे भोजन तयार करून कुणी नदी, तलावाच्या काठावर, तर कुणी टेरेस आणि घराच्या छतावर कावळ्यांसाठी पान ठेवले. मात्र, अनेक ठिकाणी कावळे अन्न खाण्यासाठी फिरकलेच नाहीत. दुसरीकडे, मखमली तलाव, कशेळी खाडी आणि बाळकुम खाडी परिसरात पितरांसाठी ठेवलेल्या अन्नावर कावळ्यांऐवजी कबुतरांनीच ताव मारल्याचे चित्र दिसून आले.
त्यामुळे ठाणे शहरात कावळ्यांची संख्या कमी होत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. कावळ्यांनी अन्न ग्रहण केले नाही, तर पितरांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचेल का ? अशी शंकाही अनेकांच्या मनात निर्माण झाली.
शहरांमध्ये कावळ्यांची संख्या कमी होत असल्याची चर्चा होत असताना कबुतरांची वाढती संख्या लक्ष वेधून घेत आहे. शहरीकरण, बांधकामे आणि रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी होणारी वृक्षतोड यामुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत आहे. कावळे उंच झाडांवर घरटी बांधतात. मात्र, मोठी आणि जुनी झाडे कमी झाल्याने त्यांना निवारा आणि घरटी बांधण्यासाठी योग्य जागा मिळणे कठीण होत आहे. पूर्वी उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यातून कावळ्यांना सहज अन्न मिळत असे. आता कचरा बंद डब्यांमध्ये जमा केला जात असल्याने किंवा नियमितपणे उचलला जात असल्याने त्यांच्या अन्नस्रोतांमध्ये बदल झाला आहे. याशिवाय, कीटकनाशके, घातक रसायने आणि प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
शहरांमध्ये इमारतींच्या गच्च्या, खिडक्यांतील जागा आणि इतर बांधकामांमुळे कबुतरांना सहज निवारा मिळतो. नागरिकांकडून नियमितपणे धान्य टाकले जात असल्याने त्यांना अन्नही सहज उपलब्ध होते. त्यामुळे अनेक ठिकाणी कबुतरांची मोठी गर्दी दिसून येते. याउलट, कावळे, चिमण्या आणि गिधाडांसारख्या पक्ष्यांच्या अधिवासासंबंधीच्या समस्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहेत. कावळ्यांची संख्या कमी होण्यामागील नेमकी कारणे निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि स्थानिक पातळीवरील पक्षीगणना आवश्यक आहे.
कावळ्यांना धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व
गरुड पुराणासह विविध धार्मिक परंपरांमध्ये कावळ्यांचा संबंध पितरांशी जोडला जातो. कावळ्याला यमराजाचा दूत किंवा पितरांचे प्रतीक मानले जाते. पितृपक्षात किंवा श्राद्धाच्या वेळी कावळ्याला अन्न देणे म्हणजे ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचवणे, अशी श्रद्धा आहे. श्राद्धाच्या भोजनातील पहिला घास कावळ्यासाठी काढण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आजही पाळली जाते. कावळ्याने अन्न ग्रहण केल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते तृप्त होतात, अशी धार्मिक समजूत आहे.
पक्ष्यांना अन्न देताना काळजी घ्या!
पक्ष्यांबद्दल दया व्यक्त करताना त्यांच्या नैसर्गिक गरजांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. पक्ष्यांना तेलकट, अतिखारट, मसालेदार किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ देणे टाळावे. त्याऐवजी स्वच्छ ठिकाणी योग्य अन्न आणि पाणी उपलब्ध करून देणे, झाडांचे संवर्धन करणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे यांसारख्या उपायांवर भर देणे गरजेचे आहे. सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांची प्रतीक्षा आणि कबुतरांनी अन्नावर मारलेला ताव हे दृश्य केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून शहरातील बदलत्या पर्यावरणाकडे लक्ष वेधणारे आहे. पितरांप्रति श्रद्धा जपत असतानाच पक्ष्यांचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक अधिवास टिकवण्याची जबाबदारीही नागरिकांनी ओळखणे आवश्यक आहे.