ठाणे

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून ठाणे शहरातील एका जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाने पोलीस प्रशासन तसेच शासनाकडे धाव घेतली असली, तरी अद्याप न्याय मिळालेला नसल्याची माहिती ॲड. सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Swapnil S

ठाणे : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून ठाणे शहरातील एका जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाने पोलीस प्रशासन तसेच शासनाकडे धाव घेतली असली, तरी अद्याप न्याय मिळालेला नसल्याची माहिती ॲड. सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोहनलाल छबिलाल जैन असे या बहिष्कृत कुटुंब प्रमुखाचे नाव असून ते ठाण्यातील पांचपाखाडी परिसरात वास्तव्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहनलाल जैन यांचा मुलगा दिव्येश याचा विवाह ३० नोव्हेंबर रोजी श्वेतांबर समाजातील सलोनी राजेश शहा हिच्यासोबत पार पडला. हा आंतरजातीय विवाह दिगंबर जैन समाजातील काही पदाधिकाऱ्यांना मान्य नसल्याने वाद निर्माण झाला. याआधी २४ ऑगस्ट रोजी भांडूप येथे झालेल्या बैठकीत दिगंबर समाजाबाहेर विवाह करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, अशा कुटुंबांना कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून न घेण्याचा नियमही करण्यात आला. लग्नास उपस्थित राहिलेल्यांकडून माफीपत्र लिहून घेणे तसेच ११ हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश व्हॉट्सॲप गटांद्वारे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. २१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोहनलाल जैन व त्यांच्या कुटुंबावर अधिकृतपणे सामाजिक बहिष्कार जाहीर करण्यात आला.

पोलिसांकडे तक्रार; कारवाई नाही

या प्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ॲड. सागर कदम यांनी केला. एकूणच, आंतरजातीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बहिष्कारासारख्या घटनांमुळे समाजातील वैचारिक दरी अधोरेखित होत असून, संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.

वीजचोरांवर AI चा 'सर्जिकल स्ट्राईक'; तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल

Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

नांदेड-भोकर महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दहा जण जखमी; भोकर व नांदेड येथे उपचार सुरू

Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत