ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री असलेल्या ठाणे शहरातील एसटी डेपोची दुरवस्था पाहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गळणारे छत, तुटलेले फलाट, खड्डेमय आगार, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप करत, येत्या १५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील एसटी डेपोची पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डेपोतील समस्यांचा आढावा घेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पाहणीदरम्यान प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, पंख्यांचा अभाव तसेच बसण्यासाठी योग्य आसनव्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. स्टेशन डेपो परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. महिला शौचालयात बेकायदेशीररीत्या पैसे घेतले जात असल्याचे समोर आल्यानंतर राजन विचारे यांनी तत्काळ ही वसुली बंद करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून, त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
मुख्य ठाणे विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांना शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पावसाळ्यापूर्वी बसेसची दुरुस्ती, वाढीव तिकीट दर मागे घेणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था करणे, नवीन ई-बसेस व सीएनजी बसेस उपलब्ध करून देणे, तसेच स्मार्ट कार्डच्या नावाखाली होणारी अतिरिक्त वसुली थांबवण्याच्या मागण्यांचा समावेश आहे. या पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्र्यांनी आलिशान गाड्या सोडून एकदा एसटी, लोकल किंवा बेस्टने प्रवास करून दाखवावा. तोपर्यंत त्यांना सामान्य जनतेचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे हाल समजणार नाहीत. सरकार केवळ प्रसिद्धीपुरते काम करत असून सामान्य जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या प्रश्नांसाठी शिवसेना शेवटपर्यंत लढा देईल.केदार दिघे, जिल्हाप्रमुख उबाठा
मंत्र्यांना टेस्लासाठी वेळ, पण एसटीसाठी नाही - राजन विचारे
प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार राजन विचारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन करतात, मात्र पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा वेळी परिवहन मंत्र्यांना टेस्ला आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेळ आहे; पण एसटी डेपोची अवस्था पाहण्यासाठी वेळ नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच खोपट येथील भूखंड क्रमांक ४४१ आणि ४३८ संदर्भातील बांधकामासाठी महापालिकेने दिलेल्या सीसीची कागदपत्रे अधिकाऱ्यांसमोर सादर केली असता, संबंधित अधिकारी त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.