ठाणे : ठाणे महापालिकेच्या उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शहरातील काही महत्वाचे प्रकल्प खासगी सहभाग (पीपीपी) माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन ते अडीच वर्षांपासून अनेक प्रकल्प रखडले होते, त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेचे कामही अडथळ्यात असल्याचे चित्र आहे. आता आयुक्तांनी अर्थसंकल्पात या रखडलेल्या प्रकल्पांना स्थान दिल्याने नव्या गतीची आशा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेकडे निधी कमी असल्यामुळे कर्ज रोख्यातून काही विकासकामे हाती घेण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, शहरातील नागरिकांना पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ठाणेबाहेरील लोकांना शहरात आकर्षित करण्यासाठी काही प्रकल्प पीपीपी मार्गाने राबविण्याचे ठरले आहे.
ठाण्यातील महत्त्वाचे प्रकल्प
१. ठाणे टाऊन पार्क विकास (पीपीपी प्रकल्प)
क्षेत्रफळ: २१.३१ एकर (कोलशेत व बाळकुम)
उपयोग: इको-टुरिझम, नागरिकांना मनोरंजनात्मक सुविधा
खर्च: रु. ६९४ कोटी
पूर्णता: मे २०२९
२. ॲम्युजमेंट व स्नो पार्क सुविधा
क्षेत्र: १,०२,५०० चौ.मी.
सुविधांमध्ये मुख्य स्नोपार्क, स्नो एरिया, स्नोराइड्स, रोलरकोस्टर, स्कायटॉवर, डिस्क-ओ-२४, जायंट डिस्कव्हरी झिपलाइन इत्यादी
खर्च: रु. २६४.३४ कोटी
पूर्णता: मे २०२९
३. ठाणे व्ह्युव्हिंग टॉवर अॅण्ड कन्व्हेंशन सेंटर - सी.बी.डी.
क्षेत्र: २५.४५ एकर (प्रेक्षागॅलरी), ३४.०७ एकर (सीबीडी - शॉपिंग मॉल, हॉटेल, कलादालन, कार्यालये)
गोल्फ कोर्स सुविधा: १०.८० एकर
खर्च: रु. ९२० कोटी
पूर्णता: मे २०३०
४. दादोजी कोंडदेव स्टेडीयम
सुविधा: आंतरराष्ट्रीय क्लब, प्रेस क्लब, व्ही.आय.पी. गॅलरी, बँक्वेट, निवासी व्यवस्था, जिम्नॅशियम, बीझनेस सेंटर, पंचतारांकित क्रिडा प्रेक्षागृह
इमारत: तळ + २३ मजले
खर्च: रु. १७१.६४ कोटी
पूर्णता: मे २०३०
५. इन्डोअर स्पोर्ट्स क्लब व युथ सेंटर
इमारत: तळ + ९ मजले, अंडरग्राऊंड ३ बेसमेंट
सुविधा: इन्डोअर स्पोर्ट्स क्लब, वाचनालय अभ्यासिका, युथ सेंटर
खर्च: रु. १२२.९१ कोटी
पूर्णता: मे २०३०
६. प्रधानमंत्री आवास योजना २.०
सदनिका: ३०८४
क्षेत्रफळ: ३० चौ. मी प्रति सदनिका
खर्च: रु. ७५० कोटी
पूर्णता: डिसेंबर २०२९
कारण: ठेकेदार न मिळाल्यामुळे योजना वारंवार बदलण्यात आली; अद्याप अपेक्षित यश नाही.