वाडा : ठाणे जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहापूर, वाडा तालुक्यातील पोशेरी तसेच भिवंडी परिसरात पावसाचा जोर अधिक जाणवला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांची छपरे व पत्रे उडाली, वीजवाहिन्यांचे नुकसान झाले, तर काही भागांत वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहिला. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
वाडा तालुक्यातील पोशेरी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे १० ते १५ घरांचे नुकसान झाले. अनेक घरांची छपरे आणि पत्रे उडून गेली.
घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने धान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे बाधित कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
पोशेरी परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या भातपिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त घरांची तसेच शेतीपिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधितांना शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शहापुरात झाडांची पडझड
तालुक्यात शहापूर शहरासह आसनगाव, वासिंद, खर्डी, कसारा, डोळखांब आणि किन्हवली परिसरातही वादळी पावसाचा जोर होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. काही भागांत घरांवरील आणि इमारतींवरील पत्रे उडून गेली. झाडे आणि फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्यावर पडलेली झाडे, झुडपे आणि वीजखांब हटविण्यासाठी शहापुरातील ‘जीवरक्षक टीम’च्या सदस्यांसह शेकडो युवकांनी बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दिवसभर मदतकार्य केले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांची छपरे व पत्रे उडाली आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून भातपिकांनाही मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.प्राजक्ता सचिन शिंगडा, सरपंच पोशेरी-पाली ग्रामपंचायत
भिवंडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भिवंडीतील नारपोलीच्या देवजीनगर परिसरातही वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. यावेळी एका झाडावर वीज पडल्याने त्याला आग लागली. झाडातून ठिणग्या आणि ज्वाला बाहेर पडत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर जवान घटनास्थळी दाखल झाले आणि प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वीज पडल्यामुळे परिसरातील इंटरनेट सेवा आणि संगणक प्रणालीवरही परिणाम झाला. राऊटर, पीसी तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे अचानक बंद पडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यापूर्वीही याच परिसरातील एका झाडावर वीज पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी काढणीच्या टप्प्यातील पिकांवर त्याचा नेमका परिणाम काय झाला, हे पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर स्पष्ट होणार आहे.