ठाणे

ठाण्यात वाहतूक नियमभंगावर करडी नजर; कॅडबरी सिग्नलवर पहिल्याच दिवशी ९५० चालक 'कैद'

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रायोगिक टप्प्यात कॅडबरी सिग्नलजवळ बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांनी पहिल्याच दिवशी तब्बल ९५० नियमभंग करणारे चालक कैद केले.

Swapnil S

ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रायोगिक टप्प्यात कॅडबरी सिग्नलजवळ बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांनी पहिल्याच दिवशी तब्बल ९५० नियमभंग करणारे चालक कैद केले. यात सर्वाधिक ४५३ दुचाकीस्वार - हेल्मेटशिवाय, तर ४२४ चालकांनी सिग्नल तोडले, ४२ जणांनी स्टॉप लाइन मोडली आणि इतर ३१ जणांनी विविध नियमांचे उल्लंघन केले, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

यातील २० चालकांनी दंडाची रक्कम त्याच दिवशी भरली आहे. नियम मोडणाऱ्यांना थेट त्यांच्या भ्रमणध्वनीवर दंडाची पावती (चलन) पाठविण्याची सुविधा यशस्वी ठरली आहे.

भरधाव वेग, सिग्नल मोडणे, हेल्मेटविना दुचाकी, सीट बेल्ट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे या योजनेद्वारे नियम मोडणाऱ्यांना जरब बसवली जाणार आहे. कॅडबरी सिग्नलवरील प्रयोग यशस्वी ठरल्याने इतर चौकांवरही लवकरच कॅमेरे कार्यान्वित होतील.
पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

२० सदस्यांचे विशेष पथक तयार

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या ताणाचा विचार करून हे पाऊल उचलले आहे. पुढील टप्प्यात शहरातील १५ महत्त्वाच्या चौकांवर असेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे सर्व कॅमेरे ठाणे वाहतूक पोलिसांच्या अद्ययावत नियंत्रण कक्षाशी जोडले जात असून, त्यावर नजर ठेवण्यासाठी २० सदस्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई