ठाणे परिवहन ताफ्यात लवकरच नव्या इलेक्ट्रिक बस; तांत्रिक तपासणीसाठी दोन बस दाखल | (संग्रहित छायाचित्र) Photo : X
ठाणे

ठाणे परिवहन ताफ्यात लवकरच नव्या इलेक्ट्रिक बस; तांत्रिक तपासणीसाठी दोन बस दाखल

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत १०० पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. मागील वर्षभरापासून रखडलेली ही प्रक्रिया आता प्रत्यक्षात उतरत असून, ७ फेब्रुवारी या योजनेतील दोन इलेक्ट्रिक बस परीक्षणासाठी ठाणे परिवहन सेवेत दाखल झाल्या आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत १०० पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. मागील वर्षभरापासून रखडलेली ही प्रक्रिया आता प्रत्यक्षात उतरत असून, ७ फेब्रुवारी या योजनेतील दोन इलेक्ट्रिक बस परीक्षणासाठी ठाणे परिवहन सेवेत दाखल झाल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात २५ बस दाखल होणार असून, त्याआधी दोन बस शहरातील विविध मार्गांवर चालवून तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. येऊर-घोडबंदर मार्ग, गायमुख घाट, भाईंदरपाडा-ठाणे ते बोरिवली, तसेच मुंब्रा आणि दिवा परिसरातील मार्गांवर या बसची चाचणी सुरू आहे. उतार-चढाव, वळणदार रस्ते, वाहतूककोंडी अशा परिस्थितीत बसच्या कार्यक्षमतेची सखोल पडताळणी केली जात आहे.

परीक्षणादरम्यान बस चालविताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण होतात का, याचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल तयार करून तो संबंधित बस उत्पादक कंपनीकडे पाठविण्यात येईल. अहवालातील निरीक्षणांनुसार आवश्यक ते बदल आणि सुधारणा केल्यानंतर या बस टप्प्याटप्प्याने ठाणे परिवहन सेवेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, या योजनेतील २५ बस स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) ठाणे परिवहन सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, बसच्या तांत्रिक पडताळणीत काही त्रुटी आढळून आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्या त्रुटी दूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे.

पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत दोन इलेक्ट्रिक बस परीक्षणासाठी ठाण्यात दाखल झाल्या आहेत. सध्या या बस विविध मार्गांवर चालवून परिवहन सेवेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन या बसच्या विविध तांत्रिक बाबींची पाहणी केली होती. त्यानंतरच ठाणे महापालिकेला परीक्षणासाठी दोन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक ठाणे परिवहन सेवा

१२३ इलेक्ट्रिक बस दाखल

ठाणे परिवहन सेवेकडे यापूर्वी केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ अंतर्गत १२३ इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या आहेत. यात ९ मीटर आणि १२ मीटर लांबीच्या बसचा समावेश असून, १२ मीटरच्या बसमध्ये सुमारे ४० प्रवाशांची आसनक्षमता आहे. इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असून, डिझेल बसच्या तुलनेत त्यांचा चालू खर्चही कमी असल्याने भविष्यात परिवहन सेवेला मोठा दिलासा मिळणार आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद