ठाणे : घरातील कचरा टाकण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांवर चौघांनी किरकोळ कारणावरून हल्ला केल्याची घटना वागळे इस्टेटमधील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. या हल्ल्यात एकाच्या कपाळावर आणि कानाजवळ चाकूने वार करण्यात आले, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर वीट मारल्याने त्याचा जबडा फ्रॅक्चर झाला. विशाल प्रजापती (२२) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आकाश प्रजापती (२०) आणि त्याचा मोठा भाऊ विशाल हे रोड क्रमांक ३३ वरील साईबाबा मंदिराजवळ कचरा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी रौनक भालेराव, आदित्य गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे आणि त्यांच्यासोबतच्या एका अनोळखी तरुणाने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी रौनकने चाकूने आकाशच्या कपाळावर आणि उजव्या कानाजवळ वार केले. तर आदित्यने वीट उचलून विशालच्या चेहऱ्यावर मारली. जखमी भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.