ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर आता मतदार यादीही शुक्रवारी (दि. १४) जाहीर केली जाणार आहे. या यादीत तब्बल ४ लाख २१ हजार २५६ नवीन मतदारांची भर पडल्याने आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. विशेष म्हणजे, यात महिला मतदारांची संख्या तब्बल २ लाख २४ हजार ७४३ ने वाढली असून, त्यांचा प्रभाव यंदाच्या निवडणुकीत ठळकपणे दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चार सदस्यीय पॅनल पद्धतीनुसार प्रभागरचना करताना २०११ ची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ गृहीत धरली गेली आहे. मात्र, सध्याची लोकसंख्या ही २५ लाखांच्या पुढे गेली आहे. लोकसंख्या जुनी असली तरी मतदारांची यादी जुलै २०२५ पर्यंतच्या नोंदींवर आधारित आहे. त्यामुळे मतदारसंख्येत झालेली ही झपाट्याने वाढ स्थानिक निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम करणार आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये मतदारांची एकूण संख्या १२ लाख २८ हजार ६०६ इतकी होती, तर आता ती १६ लाख ४९ हजार ८६२ एवढी झाली आहे.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत काही प्रभागांची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांपासून ते ५५ ते ६० हजारांपर्यंत गेल्याने, मतदारसंख्या आणि लोकसंख्या यातील तफावत वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत नव्या मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
२०१७ मधील मतदानाची स्थिती
पुरुष मतदार : ६,६७,५०४
स्त्री मतदार : ५,६१,०८७
इतर : १५
एकूण : १२,२८,६०६
जुलै २०२५ मधील मतदारसंख्या
पुरुष : ८,६३,८७४
स्त्री : ७,८५,८३०
इतर : १५८
एकूण : १६,४९,८६२
नव्या गृहसंकुलांमुळे लोकसंख्येत वाढ
ठाण्यातील घोडबंदर, दिवा, माजीवडा-पाडघा, वागळे इस्टेट आदी भागांमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः घोडबंदर परिसरात नव्या गृहसंकुलांच्या वाढीमुळे मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.