ठाणे : दिवाळीत ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य प्रभावामुळे लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात दिवाळीपुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेम प्राधिकरणापाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) नियोजित पाणी कपात रद्द केली आहे. त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा दिवाळीच्या काळात सुरळीत राहणार आहे. मात्र, एमआयडीसीने यासंदर्भात अद्याप लेखी आदेश काढलेले नसून महापालिकेला तोंडी सूचना दिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका, स्टेम आणि एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले होते. ठाणे शहरातही या कपातीमुळे नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाण्याविना राहावे लागत होते.
मात्र, दिवाळीच्या सणात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्टेम प्राधिकरणाने २ आणि ९ नोव्हेंबर रोजीचा नियोजित पाणीपुरवठा बंद रद्द केला आहे. ठाणे महापालिकेनेही स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील या दोन दिवसांची कपात मागे घेतली आहे. त्यापाठोपाठ एमआयडीसीनेही दिवाळीपुरती पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एमआयडीसीकडून बारवी धरणातून ठाणे शहरासह विविध औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे एमआयडीसीच्या निर्णयाचा ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.