ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट 
ठाणे

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; नदीपात्रात गाळ; पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

भातसा धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमधील नदीपात्रात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या साचल्यामुळे पंपिंग पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही. पाण्यातील गढूळपणामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवरही परिणाम होत असून, त्यातून ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

Swapnil S

ठाणे : भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पूर्ण क्षमतेने पंपिंग करण्यात अडचणी येत आहेत. तसेच, पाण्यातील अतिरिक्त गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. या सगळ्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ठाणेकरांना या कालावधीत ५० टक्केच पाणीपुरवठा होणार असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे शहराला दररोज ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला असल्याने ठाणेकरांना पुरेसे पाणी मिळणे अपेक्षित आहे. असे असतानाही मागील आठवड्यात कळवा, मुंब्य्रातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने शरद पवार गट आणि भाजपने महापालिकेला जाब विचारला होता. त्यात घोडबंदर भागातील काही भागांना देखील मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता अधिकचा पाऊस झाल्याने देखील ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराच्या विविध भागात केला जातो. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. परंतु या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात झाली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम

मागील काही दिवसांपासून भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. तसेच, गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा ५० टक्के कमी झाला आहे. पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. शहरामध्ये अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत