Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल (व्हिडीओतून घेतलेले स्क्रीनशाॅट्स)
ठाणे

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

संबंधित महिला प्रवासी लोकलच्या दाराजवळ उभी होती. सकाळच्या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती...

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे : दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी (दि. १०) सकाळी सिग्नलमुळे लोकल थांबली असताना प्रचंड गर्दीत दाराजवळ उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती लोकलमधून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ७.५६ वाजताच्या डोंबिवली लोकलमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही घटना लोकल चालू असताना घडलेली नसून, लोकल त्यावेळी स्थिर असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच, प्राथमिक माहितीनुसार महिलेला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रवासी लोकलच्या दाराजवळ उभी होती. सकाळच्या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. दिवा आणि मुंब्रा दरम्यान सिग्नलमुळे लोकल थांबली असताना गर्दीमुळे तिचा तोल जाऊन ती खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, महिला नेमकी कोणत्या कारणामुळे खाली पडली, याचा तपास सुरू आहे.

या घटनेबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) स्वप्नील नीला यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. "सर्वप्रथम दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी महिला लोकलमधून पडली, त्या वेळी लोकल थांबलेली होती. ही धावत्या लोकलमधून पडण्याची घटना नाही. दुसरे म्हणजे, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही," असे स्वप्नील नीला यांनी सांगितले.

महिला नेमकी कशामुळे खाली पडली, याचाही तपास केला जात आहे. "रेल्वे रुळाच्या वळणामुळे महिला पडली का, की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे. महिलांमध्ये काही वाद किंवा भांडण झाले होते का किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ती खाली पडली, याचाही आरपीएफच्या माध्यमातून तपास केला जात आहे," असेही नीला यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांनी दाराच्या पायरीवर उभे राहून किंवा फुटबोर्डवर प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून सातत्याने करण्यात येत आहे. गर्दीच्या वेळी अशा प्रकारे प्रवास केल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

ठाणे रेल्वे पोलिसांकडूनही घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात असून, संबंधित व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. "मुंब्रा आणि दिवा दरम्यान सिग्नलमुळे लोकल थांबलेली असताना, बहुधा प्रचंड गर्दीमुळे महिला लोकलमधून खाली पडली. मात्र, या घटनेची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात झालेली नाही,” अशी माहिती ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र विष्णू आवारे यांनी दिली. या घटनेमागचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

ब्लॉक आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, सध्या टिटवाळा स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेला मेगाब्लॉक आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. "हा ब्लॉक आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर उद्या शुक्रवार संध्याकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात येईल," असे स्वप्नील नीला यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण

"उद्घाटनाला येणार नाही, कारण मला लाज वाटते"; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर नितीन गडकरींची नाराजी