भाईंंदर : वेश्या व्यवसायाचा आरोपी आणि लेडीज बार-लॉजवाल्या माजी नगरसेवक अरविंद शेट्टीसाठी एकाने काढलेला तो मोर्चा भाजपचा नसून व्यक्ती विशेष मोर्चा होता, अशी टीका शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव टाळत केली आहे. त्याचबरोबर भाईंदरच्या विकासकामात अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही, स्थानिक पातळीवर काही अडचण आल्यास थेट मला सांगा, असे आश्वासन भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सुद्धा यावेळी आ. सरनाईक यांनी दिली आहे.
घोडबंदर मार्गावर चेणे येथील वाहतूक बेट, काँक्रीट रस्ता आदी कामे एमएमआरडीएच्या निधीतून मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ५ मार्चपासून सदरच्या कामांना सुरुवात झाली असताना माजी भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी त्यांच्या हॉटेलचा रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ कपडे काढून गोंधळ घालत काम बंद पाडले तसेच कामाचे सेंट्रिंग फेकून दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याप्रकरणी ठेकेदारांच्या अधिकाऱ्याने फिर्याद दिली असता शेट्टीसह संतोष पुत्रण या दोघांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी शेट्टीवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस ठाण्यात घोषणाबाजी, निदर्शने करण्यात आली. अखेर रात्री पोलिसांनी एमएमआरडीए अधिकारी व ठेकेदार अशा तिघांवर शेट्टी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मेहतांनी पोलीस, पालिका आदी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली होती.
स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी मोर्चा
भाजपच्या बॅनरखाली काहींनी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी तसेच राजकीय सुडबुद्धीने मोर्चा काढल्याचा आरोप आ. सरनाईक यांनी केला. तो भाजपचा मोर्चा नव्हे तर एका व्यक्तीविशेषचा मोर्चा होता, त्यामुळे भाजपचे बहुसंख्य लोक मोर्चात सहभागी झाले नव्हते, असे सांगत वेश्या व्यवसाय चालवत असणाऱ्या तसेच अन्य गुन्हे, तक्रारी दाखल असणाऱ्या अरविंद शेट्टीचे अनेक लेडीज बार, लॉज आहेत. त्याची अनेक बांधकामे बेकायदेशीर आहेत. अशा व्यक्तीसाठी पोलीस ठाण्यात निषेध करणे म्हणजे सुसभ्य समाज व सरकारविरोधात आंदोलन करण्यासारखे असल्याचे आ. सरनाईक यांनी म्हटले आहे.
शेट्टी सांगतात शिवसेनेत गेलो नाही म्हणून कारवाई केली. परंतु समाजाला घातक लेडीजबार व लॉजचे अनैतिक धंदे, अनधिकृत बांधकामे करणाऱ्या शेट्टी सारख्या व्यक्तीला शिवसेनेतूनच हाकलून लावले असते त्यामुळे पक्षात घ्यायचा प्रश्नच नाही. पाणी योजना, मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, सिमेंट काँक्रीट रस्ते आदी अनेक विकासकामे शहरात सुरू आहेत. या विकासकामात खोडा घालण्याचा प्रयत्न करून देखील यश येत नाही म्हणून असे उघडे होऊन लाईव्ह आणि मोर्चे काढण्याचा प्रकार सुरू आहे. - आ. प्रताप सरनाईक