ठाणे

धरण उशाला, कोरड घशाला, डोळ्यांत पाणी!शहापूरमधील गाव-पाड्यांवर पाणीटंचाईची गडद छाया

शहापूर तालुक्यातील कसारा भागातील शिरोळ घाटमाथ्यावर कुंडण नावाचे धरण आहे. या धरणात एक हजार ५६२ घनमीटर पाणीसाठा आहे.

Swapnil S

बी. डी. गायकवाड/शहापूर : शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा ही प्रचंड मोठी जलाशये असून या धरणांतील पाणी प्रामुख्याने मुंबई, ठाणे या महानगरांतील लोकांना पुरविले जात आहे, तथापि, ज्या तालुक्यांत ही धरणे आहेत तेथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 'धरण उशाला, कोरड घशाला आणि डोळ्यांत पाणी' अशी दयनीय स्थिती शहापूर तालुक्यातील जनतेची झाली आहे.

धरणांचे गाव असलेल्या शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील बहुसंख्य गाव-पाडे तहानलेले आहेत. तालुक्यातील फुगाळा ग्रामपंचायत हद्दीतील आघान वाडी, पारधवाडी, नारलवाडी, रानविहीर, कोथळे आदी गाव-पाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. या भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार ६ टँकर्सनी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कसारा खुर्दमधील पारधवाडी येथे दोन विहिरी तसेच एक बुडकी आहे, तर नारळवाडीत दोन विहिरी आहेत. या विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तालुक्यातील रानविहीर ग्रामपंचायतीच्या जल स्वराज्य योजनेचे चार लाख रुपये वीज बिल थकल्याने येथील मधली वाडी या आदिवासी वाडीतील लोकांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डवऱ्याचे गढूळ पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी या भागातील जनावरेही पाणी पितात, तर तळवाडे ग्रामपंचायतीच्या पाड्यांमधील परिस्थिती फारशी काही वेगळी नाही. केंद्र सरकारचा विकासरथ गावात फिरविण्यापेक्षा आम्हाला पाण्याचा टँकर द्या, अशी मागणी फुगाला ग्रामपंचायतीचे सरपंच जीवा भला यांनी केली.

पर्यायी उपाययोजना

शहापूर तालुक्यातील कसारा भागातील शिरोळ घाटमाथ्यावर कुंडण नावाचे धरण आहे. या धरणात एक हजार ५६२ घनमीटर पाणीसाठा आहे. त्यातून या भागातील १०२ हेक्टर क्षेत्रात जलसिंचन होते. या धरणातून कसारा भागातील वाशाला, खर्डी, अजनुप गायदरा या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या धरणाचा अधिग्रहण करण्याचा प्रश्न बाकी आहे. तसेच या धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने कुंडण धरणातून पाणीपुरवठा करण्यात येऊ नये, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे कुंडण धरणातून १५ ते २० किमी अंतरावरील ६ गावे आणि १२ वस्त्यांना ठाणे जिल्हा परिषदेतर्फे शहापूर पंचायत समितीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडून ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

कुंडणचे पाणी पिण्या योग्यच!

कुंडण धरणातून पाणीपुरवठा करण्याअगोदर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ते पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल देण्यात आला होता; परंतु गावकऱ्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून येणाऱ्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती शहापूर पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विकास जाधव यांनी दिली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मागील पाच वर्षांपासून या गाव-पाड्यांना कशा प्रकारे पाणीपुरवठा करण्यात येतो, याबाबतची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी सांगितले.

शहापूर तालुका हा आदिवासी भागात वसलेला तालुका आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असून त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या कामी तातडीने शासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहापूर तालुका श्रमजीवी संघटनेचे सचिव प्रकाश खोडका यांनी दिला आहे.

४० नळपाणी योजना अपूर्ण

यंदा जलजीवन मिशन योजना पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या योजनेतून जनतेला पाणी मिळणे कठीण होऊन बसले आहे. ही योजना इगतपुरी येथील भावली धरणावर अवलंबून आहे. या योजनेचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे. शहापूर तालुक्यात यापूर्वी ४० हून अधिक नळपाणी पुरवठा योजना अपूर्ण राहिल्या आहेत. अनेक गावांतील नळपाणी पुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेला पाणी मिळाले नाही. दरम्यान, २०२० या वर्षी केंद्र सरकारने जल जीवन योजना आणली, त्यानुसार शहापूर तालुक्यातील गाव-पाड्यांसाठी १७९ नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १२१ योजना नाबार्डच्या असून नवीन तर ७० नळपाणी पुरवठा योजना एनजीबी यांच्या आहेत. त्या अधिक चांगल्या कशा होतील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश